स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, तर जवाहरलाल नेहरू खरे ‘माफीवीर’ ! – भाजप

मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळी अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची क्षमा मागितल्याचा आरोप केला होता. या संदर्भात त्यांनी काही कागदपत्रेही दाखवली होती. त्यावरून भाजपने राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत ‘राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरूच हेच खरे ‘माफीवीर’ होते’, असे उघड केले आहे. यासाठी भाजपने नेहरूंच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत काही कागदपत्रेही सादर केली आहेत.

भाजपने कागदपत्रांद्वारे म्हटले आहे की, १४ दिवसांचा कारावास सहन न झाल्याने पंडित नेहरू यांनी त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने ब्रिटीश सरकारची क्षमा मागितली होती. त्यानंतर ते नाभा कारागृहातून बाहेर पडले. एवढेच नव्हे, तर एकूण ४ जणांना अटक केली असतांना नेहरूंनी स्वतःसह स्वतःच्या मित्रांवरील आरोप चौथ्या सहकार्‍यावर ढकलून सुटका करून घेतली. नेहरूंनी आत्मचरित्रात ‘त्या चौथ्याकडे सुटकेसाठी योग्य ओळख नसल्याने त्याला आत रहावे लागले’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आनंदाने स्वीकारून ती १५ वर्षे अतोनात यातना सहन करून भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला नाही, हेच यातून स्पष्ट होते !