|
नगर – उल्हास नलावडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ हे नाटक येथील ‘स्वराज्य युवा प्रतिष्ठान’च्या वतीने ६१ व्या ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धे’त पहिल्या दिवशी सादर झाले. तथापि या नाटकातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप सावरकरप्रेमींनी केला आहे. या नाटकामध्ये दाखवण्यात आलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने ‘नथुराम गोडसे यांना गांधी हत्या केल्याचा पश्चाताप झाला आणि यासाठी सावरकरही दोषी होते’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर सावरकरप्रेमींनी आक्षेप घेतला.
नाटक अंतिम टप्प्यात असतांनाच सावरकरप्रेमींनी सभागृहात उभे राहून ‘हे नाटक बंद करा’, अशी घोषणा दिली. या प्रकरणी ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असून अशा नाटकाचे प्रयोग राज्यात पुन्हा कुठेही होऊ देणार नाही’, असेही सावरकरप्रेमींनी या वेळी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; मात्र आक्रमक सावरकरप्रेमींनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य नाट्य स्पर्धा राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून घेण्यात येते. या स्पर्धेत येणार्या नाटकाची संहिता चित्रपट परीनिरीक्षण मंडळ अर्थात् ‘सेन्सॉर बोर्ड’ संमत करते. त्यामुळे ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सातत्याने नाव घेणार्या राज्यातील सरकारने या नाटकाला अनुमती दिलीच कशी ?’, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. ‘सेन्सॉर बोर्ड’ नेमके कशा पद्धतीने काम करते ? आणि त्यावर सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही का ?’, असे प्रश्नही सावरकरप्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. काही ज्येष्ठ रंगकर्मींनीही या नाटकात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.