‘हर हर महादेव’ चित्रपटात ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटनांचा समावेश ! – अमर देशपांडे आणि किरण देशपांडे, बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज

बाजीप्रभूंच्या वंशज रतन देशपांडें

पुणे – ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ याचा अर्थ ‘इतिहास पालटणे’, असा होत नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम पालटणे अनुचित आहे. ऐतिहासिक चित्रपट काढतांना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, तसेच इतिहास सल्लागार यांना दायित्वाने कार्य करावे लागते. दुर्दैवाने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या संदर्भात अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखवण्यात आल्या आहेत, असे मत बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज अमर देशपांडे आणि किरण देशपांडे यांनी १६ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

अमर देशपांडे म्हणाले की, ‘हर हर महादेव’ चित्रपटात काही प्रसंगांवर इतिहासाच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजी प्रभु देशपांडे यांच्यातील लहानपणीच्या कटू प्रसंगांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी प्राणांची एकत्रित आहुती दिलेली आहे. अशा प्रसंगामुळे फुलाजी प्रभु यांची प्रतिमा मलीन होत आहे. बाजीप्रभु देशपांडे हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते; परंतु चित्रपटामध्ये अनेक वेळा ते भावनिक होतांना दाखवलेले आहेत. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट निदान इतिहास तज्ञांना तरी दाखवणे आवश्यक होते.