बलात्कार्‍यांना भर चौकात फाशी देऊन मृतदेह गिधाडांसमोर फेका !

मध्यप्रदेशातील भाजपच्या सरकारमधील संस्कृतीमंत्री उषा ठाकुर यांची मागणी !

संस्कृतीमंत्री उषा ठाकुर

महू (मध्यप्रदेश) – गुन्हेगार बलात्काराचे कृत्य समाजात राहून करत असतो; मात्र त्याला शिक्षा कारागृहाच्या चार भिंतींमध्ये दिली जाते. असे केल्याने गुन्हेगारांना भीती वाटत नाही. त्यामुळे अशांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांमध्ये भय निर्माण होईल. तसेच अशा गुन्हेगारांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारही करू नये. त्यांचा मृतदेह गिधाडांसमोर फेकला पाहिजे. यामुळेच गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल, असे परखड मत मध्यप्रदेशाच्या संस्कृतीमंत्री उषा ठाकुर यांनी व्यक्त केले. त्या येथील कोदरिया गावामध्ये एका सभेत बोलत होत्या.

उषा ठाकुर पुढे म्हणाल्या की, अशा गुन्हेगारांच्या विरोधात स्वाक्षरी चळवळ राबवली पाहिजे. प्रत्येक घरातून माता-भगिनी यांनी यात सहभागी झाले पाहिजे. यानंतर गुन्हेगारांना भर चौकात फाशी देण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले पाहिजे. अशा प्रकरणात मानवाधिकार आयोग खड्ड्यात जाऊ दे. अशा नरपिशाच्चांना कुठे आला मानवाधिकार ?