५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली किर्लोस्‍करवाडी (सांगली) येथील चि. ऋषिता रणजित खोत (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य)  चालवणारी पिढी ! चि. ऋषिता रणजित खोत या पिढीतील आहेत !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

चि. ऋषिता रणजित खोत

१. गर्भधारणेनंतर

१ अ. गरोदरपणात तीर्थक्षेत्रे आणि तीन शक्तीपिठे येथे जाऊन दर्शन घेण्याचा लाभलेला दैवी योग ! : ‘आम्हाला आमची कुलदेवी माहूरगडची रेणुकामाता आहे’, हे समजले होते; मात्र पुष्कळ वेळा देवीच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन करूनही जाण्याचा योग येत नव्हता. या वेळी मी ऋषिताच्या वेळी गरोदर असतांना ४ थ्या मासात कुलदेवीच्या दर्शनाला जाण्याचे नियोजन झाले. त्या वेळी आम्ही कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानीदेवी, माहूरगडची रेणुका ही ३ शक्तीपिठे आणि शिर्डी, शेगाव इत्यादी तीर्थक्षेत्रे यांचे अन् कांदळी येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

१ अ १. ‘गर्भातील बाळाच्या चैतन्यामुळेच तीर्थक्षेत्रांचे दर्शन होत आहे’, असे वाटून बाळाविषयी कृतज्ञता वाटणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती होऊन डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते. तेव्हा ‘गर्भातील बाळाच्या चैतन्यामुळेच मला अशा तीर्थक्षेत्रांचे दर्शन होत आहे’, असे वाटून मला बाळाविषयी कृतज्ञता वाटली. या ५ दिवसांच्या प्रवासात मला काहीच त्रास झाला नाही आणि सर्व ठिकाणी देवदर्शनही अगदी सहजपणे झाले. ‘गरोदरपणात देवीच्या ३ शक्तिपिठांचे दर्शन होणे, हा दैवी योगच असावा’, असे मला वाटले.

१ आ. ‘गर्भातील बाळ मुलगी आहे’, याविषयी मिळालेली पूर्वसूचना ! : यजमानांच्या बढतीसाठी (‘प्रमोशन’साठी) असलेल्या परीक्षेकरता आम्ही काही मास पनवेल येथील देवद आश्रमात रहाण्यासाठी गेलो होतो. तेथे मला नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळाली. तेव्हा मी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीभोवती प्रदक्षिणा घालतांना मला ‘गुलाबी रंगाचा झगा (फ्रॉक) घातलेली एक लहान मुलगी माझ्या समवेत प्रदक्षिणा घालत आहे’, असे अनेकदा जाणवले.

१ इ. ‘चैतन्याचा गोळा गर्भात वाढत आहे’, असे जाणवणे : ‘गर्भातील बाळाच्या देहाची नामजपाने शुद्धी करतांना त्याला आनंद होत आहे आणि ते गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे मला वाटायचे. ‘नामजपाने गर्भातील बाळाच्या देहातील प्रत्येक पेशी चैतन्यमय होत आहे आणि चैतन्याचा गोळाच माझ्या गर्भात वाढत आहे’, असे मला वाटत होते.

१ ई. देवतांची स्तोत्रे म्हणतांना बाळाची हालचाल जाणवणे : गरोदरपणी माझ्याकडून नियमितपणे रामरक्षा, मारुति स्तोत्र आणि देवीकवच ऐकले जात होते. स्तोत्रे ऐकतांना मला बाळाची हालचाल जाणवत असे.

१ उ. ‘सात्त्विक बाळ जन्माला येऊ दे’, अशी प्रार्थना करणे : ‘माझ्या पोटी सात्त्विक बाळ जन्माला येऊ दे’, यासाठी मी नियमितपणे परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी प्रार्थना करत असे.

१ ऊ. गर्भातील बाळाला दर्शनाची ओढ असल्याचे जाणवणे : गरोदरपणी मी मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जात असे. तेव्हा देवाला प्रार्थना करतांना ‘देवतेच्या मूर्तीसमोर एक लहान बाळ नतमस्तक झाले आहे’, असे मला अनेकदा दिसत असे. तेव्हा ‘माझ्यापेक्षा गर्भातील बाळाला देवाच्या दर्शनाची ओढ अधिक आहे’, असे मला जाणवायचे.

१ ए. किर्लाेस्करवाडी येथील घराच्या आवारात असलेल्या मोगर्‍याचे झाड वेळेआधीच पुष्कळ बहरणे, जणू ‘बाळाच्या स्वागतासाठीच फुले उमलली आहेत’, असे वाटणे : मला नववा मास चालू झाल्यानंतर आम्ही आमच्या गावी किर्लोस्करवाडी येथे गेलो होतो. तेव्हा आम्ही घरी गेल्यानंतर थोड्याच दिवसांत घरासमोर असलेल्या मोगर्‍याच्या झाडावर पुष्कळ फुले उमललेली दिसली. प्रतिवर्षी थोडा पाऊस झाल्यानंतर फुले येतात; परंतु यावर्षी पाऊस पडण्याआधीच झाडे बहरली होती. या झाडाला आतापर्यंत इतकी फुले कधीच आली नव्हती. ‘जणू बाळाच्या स्वागतासाठीच ती फुलली आहेत’, असे वाटत होते.

काही अडचणींमुळे शस्त्रकर्म करून माझी प्रसूती करावी लागली. मला हा निर्णय सहजतेने स्वीकारता आला आणि स्थिर रहाता आले. मला मुलगी झाली.

श्री. रणजित भीमराव खोत

२. जन्मानंतर

२ अ. वय – जन्म ते १ मास

१. बाळाच्या जन्मानंतर आधुनिक वैद्यांनी ५ मिनिटांतच बाळाला माझ्या हातांत आणून दिले. तेव्हा बाळ सगळीकडे आनंदाने पहात होते. बाळाची दृष्टी स्थिर होती आणि त्याच्या तोंडवळ्यावर तेज जाणवत होते. बाळाकडे पाहून ‘आनंद आणि चैतन्य’ हे दोनच शब्द माझ्या मनात आले आणि ‘बाळाच्या रूपातील देवीचे दर्शन घ्यावे’, असे वाटले.’

– सौ. सोनाली रणजित खोत (चि. ऋषिताची आई), किर्लोस्करवाडी, जिल्हा सांगली.

२. ‘बाळाच्या जन्मानंतर थोड्या वेळाने मी पू. अश्विनीताई (पू. (सौ.) अश्विनी पवार) यांना हे कळवण्यासाठी देवद आश्रमात भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी बाळाच्या कानाला भ्रमणभाष लावण्यास सांगितला. त्या वेळी बाळ काहीतरी गुणगुणत होते. पू. अश्विनीताईंनी मला ‘बाळ त्यांच्या समवेत बोलत होते’, असे सांगितले. ‘त्या वेळी बाळावर असलेले संतांचे प्रेम पाहून मला ‘संत आणि परात्पर गुरु डॉक्टर’ यांच्याविषयी फार कृतज्ञता वाटली.’ – श्री. रणजित भीमराव खोत (चि. ऋषिताचे वडील)

३. ‘बाळाचा जन्म शुक्रवारी झाला. तेव्हा ‘बाळाच्या रूपात देवीच घरी आली आहे’, असे मला वाटले.’ – सौ. अलका भीमराव खोत (ऋषिताची आजी, वडिलांची आई)

४. ‘मी बाळाला पहाण्यासाठी रुग्णालयात गेले होते. तेव्हा बाळ नुकतेच झोपले होते; पण मी जवळ जाऊन बसल्यावर बाळाने लगेच डोळे उघडून पाहिले. बाळाच्या तोंडवळ्यावर तेज दिसत होते.’ – श्रीमती लता झांजुर्णे (ऋषिताची आजी, आईची आई), सातारा

५. ‘बाळ फार रडत नसे. जन्मानंतर बाराव्या दिवशी बाळाचे कान टोचले. तेव्हा ते १ – २ मिनिटेच रडले आणि परत शांत झाले. यानंतर २ घंट्यांनी लगेचच बाळाचा नामकरण सोहळा होता. संपूर्ण कार्यक्रमात बाळ अगदी शांत होते.

६. पू. अश्विनीताईंना ‘बाळाचे नाव काय ठेवू ?’, असे विचारल्यावर त्यांनी ‘ऋषिता’ आणि ‘रुद्रांशी’ ही २ नावे लगेचच सुचवली. त्यानुसार बाळाचे ‘ऋषिता’ असे नाव ठेवले.

(त्यानंतर काही दिवसांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये पू. वामन राजंदेकर यांच्याविषयी एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात ‘संतांनी बाळाचे नाव ठेवल्यास त्याचा पुढचा कार्यभार तेच वहातात’, असे वाचनात आले. तेव्हा ‘बाळाचे नाव संतांनी ठेवणे’, हा बाळावर देवाचा असलेला मोठा कृपाशीर्वाद आहे’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’)

– श्री. रणजित भीमराव खोत

२ आ. १ ते ३ मास

सौ. सोनाली रणजीत खोत

१. ‘चि. ऋषिताला ‘इंजेक्शन’ दिल्यावर ती तात्पुरती रडते आणि लगेच शांत होऊन परत खेळते.

२. ती झोपेत हाताच्या बोटांच्या विविध मुद्रा करते.

३. समाजातील लोक तिच्याकडे आकर्षित होतात आणि तिला जवळ घेतात.’

– सौ. सोनाली रणजीत खोत

४. ‘ती ३ मासांची असतांना तिला गणपतीच्या मंदिरात नेले होते. तिला गणपतीसमोर ठेवताच तिने हसत हसत दोन्ही हात जोडून नमस्कार केला.’ – श्री. भीमराव खोत, (आजोबा, ऋषिताच्या वडिलांचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ इ. वय ४ ते ६ मास

२ इ १. देवाची ओढ

अ. ‘श्री गणेशचतुर्थीच्या वेळी तिला घरातील गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवले होते. तेव्हा ती मूर्तीकडे एकटक पहात होती. तेव्हा ‘जणू ती त्या मूर्तीतून चैतन्य ग्रहण करत आहे’, असे वाटत होते.

आ. तिचा मामा तिची छायाचित्रे काढत असतांना तिने श्रीकृष्णाप्रमाणे हातात बासरी धरल्याची आणि पाय एकमेकांवर ठेवल्याची मुद्रा केली होती.

इ. तिला अंघोळ घालतांना मला श्रीकृष्णाची आठवण होते. माझ्या मनात ‘मी बाळकृष्णाला अंघोळ घालत आहे’, असा भाव निर्माण होऊन मला आनंद जाणवतो.

ई. ती रडत असतांना तिला सनातनचे पंचांग दाखवले की, ती लगेचच शांत होते. ती पंचांगाकडे पाहून हसते. त्यातील देवतांची चित्रे पाहून तिला आनंद होतो.

उ. तिच्या अंगावर अधून-मधून पुष्कळ दैवी कण दिसतात.’

– सौ. सोनाली रणजीत खोत

२ ई. वय ७ ते ९ मास

१. ‘मी देवपूजा करतांना ती झोपली असेल, तरी ती आरतीच्या वेळी उठते. आरती करतांना ती रांगत माझ्याजवळ येते आणि आरती होईपर्यंत शांत बसते.

२. तिला घेऊन नामजप केला की, माझा नामजप चांगला होतो.’

– सौ. अलका भीमराव खोत

३. ‘भजने किंवा भक्तीगीते लावल्यावर ती लगेच हातातील सर्व खेळणी सोडून आवाजाच्या दिशेने जाते आणि टाळ्या वाजवते. श्रीकृष्णाचा आणि श्री गुरूंचा श्लोक अन् आरती म्हणतांना किंवा तिच्याजवळ बसून मोठ्याने नामजप करतांना ती नमस्कार करते.’

– सौ. सोनाली रणजीत खोत

२ उ. वय १० मास ते १ वर्ष

१. ‘आम्ही आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू लागल्यावर तिलाही उपाय करून घेण्याची घाई होते. तिला कापूर किंवा अत्तराचा सुगंध दिल्यावरच ती शांत बसते.’ – श्री संकल्प झांजुर्णे (मामा), सातारा

२. ‘मी दुर्गादेवीचा नामजप करतांना ती शांतपणे ऐकते किंवा काही दंगा न करता खेळते.

३. तिला नामजप करत किंवा श्लोक म्हणत खाऊ भरवला, तर ती लगेचच खाऊ खाते. नामजप केल्यावर किंवा श्लोक म्हटल्यावर तिला आनंद होतो.’

३. स्वभावदोष : हट्टीपणा, मोठ्याने ओरडणे.

‘प.पू. गुरुमाऊली, तुम्हीच ही सूत्रे लिहून घेतलीत, त्यासाठी तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक