सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज (११.११.२०२२) तेरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…

एका नातेवाइकाने (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांची श्री. राम होनप यांनी दिलेली उत्तरे 

पू. पद्माकर होनप

‘बाबांचा देहत्याग झाल्यावर काही दिवसांनी मला एका नातेवाइकाचा भ्रमणभाष आला. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

श्री. राम होनप

१. पू. पद्माकर होनप यांना देहत्यागानंतर जनलोकात स्थान मिळणे

एक नातेवाईक : बाबा देहत्यागानंतर कुठे गेले आहेत ?

श्री. राम होनप : जनलोकात

२. पू. पद्माकर होनप संत असल्याने दशक्रिया विधी होण्याआधीच त्यांना जनलोकात स्थान मिळणे

एक नातेवाईक : बाबा त्यांचा दशक्रियाविधी होईपर्यंत थांबले नाहीत का ?

श्री. राम होनप : सर्वसाधारण व्यक्तीची साधना नसते. त्यामुळे तिला श्राद्धविधीतून मिळणार्‍या ईश्वरी शक्तीद्वारे पुढील गती प्राप्त होते. त्यामुळे तिला पुढील गती मिळण्यासाठी श्राद्धविधी होईपर्यंत थांबावे लागते. बाबा संत असून त्यांची पुष्कळ साधना असल्याने त्यांना देहत्यागानंतर थेट जनलोकात स्थान मिळाले.

३. पू. पद्माकर होनप देहत्यागानंतर जनलोकात गेले असले, तरी त्यांच्यासाठी दशक्रिया विधी करण्यामागील कारण

एक नातेवाईक : बाबांसाठी दशक्रिया विधी करणे, ही औपचारिकता आहे का ?

श्री. राम होनप : सनातन धर्मात श्राद्धविधीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. धर्मशास्त्राचा आदर करणे आणि त्याचे पालन करणे महत्त्वाचे असल्याने आपण बाबांचे दशक्रियाविधी करत आहोत.

४. मृत झालेल्या अन्य नातेवाइकांचे मृत्यूनंतरचे स्थान गुरूंच्या आज्ञेने शोधता येणे

एक नातेवाईक : आपल्या अन्य नातेवाइकांचा मृत्यू झाला आहे. ते मृत्यूनंतर कुठे गेले आहेत ? हे तू सूक्ष्मातून शोधू शकतो का ?

श्री. राम होनप : गुरूंनी आज्ञा दिली, तर शोधता येईल.’

– श्री. राम होनप (५.११.२०२२)


पू. पद्माकर होनप यांनी वर्ष २०१८ मध्ये पुढे स्वतःचा मृत्यू रामनाथी आश्रमात होण्याविषयी इच्छा व्यक्त करणे आणि प्रत्यक्षातही असेच घडणे

‘वर्ष २०१८ मध्ये बाबांना पुणे येथील एका रुग्णालयात कर्करोग झाल्याचे निदान झाले. तेथे त्यांची दोन मोठी शस्त्रकर्मे झाली. त्या वेळी बाबांची प्रकृती गंभीर होती; परंतु ते मृत्यूच्या संकटातून बाहेर आले होते. बाबा पुणे येथे वैद्यकीय उपचार घेऊन रामनाथी आश्रमात आले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ पुढे माझा मृत्यू रामनाथी आश्रमातच व्हायला हवा. अन्य ठिकाणी नको.’’ प्रत्यक्षातही असेच घडले.’

– श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)


देहत्यागाच्या दिवशी पू. पद्माकर होनप यांच्या सेवेचे ज्ञान आतून होणे

‘३०.१०.२०२२ च्या पहाटे ४ वाजता मला झोपेतून अकस्मात् जाग आली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘बाबांना तहान लागली आहे.’ बाबा स्वतः पाणी पिऊ शकत नसल्याने मी उठून बाबांना चमच्याने पाणी दिले. त्या वेळी एखादा तहानेने व्याकूळ झाला आहे आणि त्याला पाणी दिल्यावर तो लगेच ते ग्रहण करतो, त्याप्रमाणे बाबांनी पाणी घेतले. तेव्हा लक्षात आले, ‘बाबांना पुष्कळ तहान लागली आहे.’ त्यानंतर मी चमच्याने त्यांना काही वेळ पाणी दिले आणि त्यांनी ते ग्रहण केले. त्यानंतर दीपालीताईच्या (सुश्री (कु.) दीपाली होनप यांच्या) मनात विचार आला, ‘बाबांना जेवण जात नाही, तर त्यांना आईसक्रीम देऊया. तेव्हा बाबांनी २ – ३ चमचे आईसक्रीम घेतले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘तीन दिवसांपूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाबांसाठी प्रसाद दिला होता. तो आता बाबांना द्यायला हवा.’ त्यानंतर मी पाण्यात प्रसाद मिसळून तो बाबांना दिला. हे सर्व झाल्यावर बाबा शांत झोपले.

वरील प्रसंगात माझ्या मनात विचार आले, ‘बाबा पुष्कळ रुग्णाईत असल्याने त्यांना काय हवे किंवा काय नको, हे शब्दांत सांगता येत नाही; म्हणून देवाने योग्य ते विचार देऊन आमच्याकडून बाबांची सेवा करवून घेतली. यावरून ‘देव भक्ताची काळजी कशी घेतो ?’, हे लक्षात आले.’

– श्री. राम होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा धाकटा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.११.२०२२)


(कै.) पू. पद्माकर होनप यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या देहत्यागानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

श्री. सुरेंद्र होनप

१. (कै.) पू. पद्माकर होनप यांची गुणवैशिष्ट्ये

अ. बाबांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा होती. ते सांगतील तीच बाबांसाठी पूर्व दिशा होती.

आ. बाबा जीवन जगतांना सर्वांमध्ये असूनही नसल्यासारखे होते; कारण त्यांचे जीवन आध्यात्मिक स्वरूपाचे होते.

२. (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

अ. बाबांचे अंत्यविधी करतांना माझे मन निर्विचार आणि आनंदी होते.

आ. बाबांच्या अस्थी पाण्यात विसर्जित करतांना मला रक्षेतून पुष्कळ दैवी गंध येत होता.

कृतज्ञता

‘बाबा पुष्कळ रुग्णाईत आहेत’, असे समजल्यावर मी त्यांना भेटण्यासाठी नाशिकहून गोव्याला आलो. बाबांची भेट झाली. त्या वेळी त्यांची प्रकृती पुष्कळ बिघडली होती आणि त्यानंतर त्यांचा देहत्याग झाला. या सर्व परिस्थितीत माझ्या मनात कुठलेच विचार येत नव्हते. ‘या कठीण प्रसंगात मला स्थिर रहाता आले’, या विषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. सुरेंद्र होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांचा मधला मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२२)

  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक