संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठातील परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून केले उत्तीर्ण !

२ कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

संभाजीनगर – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने घेतलेल्या ‘एम्.एस्सी.’च्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुण वाढवून त्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. याविषयी परीक्षा आणि मूल्यमापन संचालक गणेश मंझा यांच्या तक्रारीवरून परीक्षा विभागातील कक्ष अधिकारी दिनेश पांढरे आणि कोमल गवळी या २ कर्मचार्‍यांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठवाडा विद्यापिठाच्या वतीने मार्च-एप्रिल २०१९ मध्ये संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या ४ जिल्ह्यांतील महाविद्यालयांत एम्.एस्सी. रसायनशास्त्र आणि डी. फार्मसी या विषयांची ‘ऑफलाईन’ पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल मे २०१९ मध्ये घोषित करण्यात आला होता. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापिठाकडे पुनर्पडताळणीसाठी अर्ज दिले होते.

पेपर पुनर्पडताळणीसाठी आल्यावर कक्ष अधिकारी दिनेश पांढरे आणि तत्कालीन कर्मचारी कोमल गवळी यांनी संगनमत करून अनुत्तीर्ण झालेल्या एम्.एस्सी. रसायनशास्त्र या विषयातील ६ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी २ सत्रांचे गुणपत्रिकेतील गुणवाढ मिळून एकूण १२ विद्यार्थ्यांच्या गुणात पालट केला. विशेष म्हणजे यासाठी कोमल गवळी हिने कोड आणि यूजर आयडी यांचा वापर करून गुण वाढ केली. ज्यात ८ नोव्हेंबर २०१९ ते २९ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत गुणात वाढ केल्याची माहिती समोर आली आहे.

डीफार्मसी विद्यार्थ्यांच्या गुणातही वाढ !

एम्.एस्सी. रसायनशास्त्राप्रमाणेच डीफार्मसी विद्यार्थ्यांच्या गुणातही वाढ करण्यात आले आहे. डीफार्मसी या विषयातील विद्यार्थी असे एक-एक विद्यार्थी, दोन्ही अभ्यासक्रम मिळून एकूण २३ विद्यार्थ्यांचे परस्पर गुण वाढवून गुणपत्रिका वितरीत करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी विद्यापीठ स्तरावर याची चौकशी करून दोषी आढळल्याने वरील दोघांना वर्ष २०१९ मध्येच निलंबित केले होते.

संपादकीय भूमिका

अशाप्रकारे गुण वाढवून उत्तीर्ण केलेले विद्यार्थी कसे काम करणार ?