भारतात सर्वत्र दिसले ग्रस्तोदित चंद्रग्रहण !

(ग्रस्तोदित म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब)

नवी देहली – वर्ष २०२२ मधील शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर या दिवशी भारताच्या सर्व भागांत दिसले. चंद्रग्रहणाचे वेध सूर्यादयापासून लागले होते. दुपारी ४.२३ पासून ते देशातील विविध ठिकाणी दिसू लागले. सायंकाळी ६.१९ पर्यंत ते वेगवेगळ्या भागांतून पहाता आले. संपूर्ण चंद्रग्रहण हे ईटानगर (अरुणाचल प्रदेश), कोहिमा (नागालँड), कोलकाता (बंगाल), जगन्नाथपुरी (ओडिशा), रांची (झारखंड) आणि पाटलीपुत्र (बिहार) येथे दिसले. उर्वरित भारतात ते आंशिक रूपाने पहाता आले.

चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, ऑस्टे्रलिया आणि संपूर्ण दक्षिण अमेरिका येथे दिसले. गेल्याच मासात २५ ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रहण झाले होते. ते भारतात खंडग्रास रूपाने दिसले होते. हे ग्रहण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी झाल्याने पौर्णिमेला करण्यात येणारे दीपदान एक दिवस आधी, म्हणजे ७ नोव्हेंबरला करण्यात आले.