‘मुंबई’ असे नामांतर होऊनही कागदोपत्री मुंबई उच्च न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ !

‘बाँबे हायकोर्ट’चे नामांतर ‘महाराष्ट्र हायकोर्ट’ करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबे’ शहराचे नामांतर ‘मुंबई’ असे करण्यात येऊनही आजही येथील उच्च न्यायालयाचा कागदोपत्री उल्लेख ‘बाँबे हायकोर्ट’ असाच करण्यात येत आहे. ‘बाँबे हायकोर्ट’चे नामांतर ‘महाराष्ट्र हायकोर्ट’ असे करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने ३ नोव्हेंबर या दिवशी फेटाळून लावली. या वेळी हा प्रकार समोर आला.

१. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर ते न्यायालयात न्याय मागू शकतात; परंतु या याचिकेत तसा उल्लेख नाही. न्यायालयाचे नामांतर करण्याची प्रक्रिया संसदीय किंवा कायदेमंडळ यांच्या माध्यमातून व्हायला हवी, असे नमूद करत न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाम यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.

२. वर्ष १९६० मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘बाँबे हायकोर्ट’चे नाव ‘महाराष्ट्र हायकोर्ट’ करावे’, असा आदेश काढला होता. वर्ष १९९५ मध्ये ‘बाँबेे’चे नाव ‘मुंबई’ करण्यात आले; परंतु ‘बाँबे हायकोर्ट’ या नावात अद्याप पालट करण्यात आलेला नाही.

३. वर्ष २०१६ मध्ये ‘बाँबे हायकोर्ट’चे नामांतर ‘मुंबई हायकोर्ट’ व्हावे, यासाठी संसदेत विधेयक सादर करण्यात आले; मात्र ते संमत होऊ शकले नाही.

केंद्र सरकारने लक्ष घालणे, तर महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करणे आवश्यक !

नाव पालटूनही न्यायालयाचा उल्लेख ‘बाँबे’ असा होत असल्यामुळे केंद्र सरकारने याकडे लक्ष घालून योग्य तो पालट करावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.