राष्ट्र आणि जनता यांच्या रक्षणासाठी हलालद्वारे निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे हाच उद्देश !

दैनिक ‘सागर’ या वृत्तपत्रामध्ये ‘हलाल’ याविषयी पुढील अतार्किक आणि असंबद्ध लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यांतील काही सूत्रांचे खंडण येथे देत आहोत. हे मूळ लिखाण ‘शुद्धलेखनात पालट न करता जसेच्या तसे’ दिले आहे. सदर लेखकाला विषयाची व्याप्ती, त्यामुळे राष्ट्राला आणि जगाला असलेला धोका आदी गोष्टी ठाऊक नसल्यामुळे त्यांनी अज्ञानातून हे लिखाण केल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे ‘समाजात अपसमज पसरू नये’ आणि या विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात यावे, एवढ्याच उद्देशाने पुढे काही योग्य सूत्रे दिली आहेत.

टीका

हलाल म्हणजे काय ? याचा अर्थ काय लावला जात आहे, ही काहीच बाब लक्षात येत नाही. बकरा किंवा कोंबडी / निर्विकार निराकार व सर्वत्र पसरलेल्या त्या एका ईश्वराचे नाव ज्याला अल्लाह (सनातनमध्ये ब्रम्हा – विश्वाचा निर्माण, विष्णु – पालनकर्ता संबोधले जाते किंवा रब, खालीक मालिक, रहिम, गफूर करिम सत्तार अशी अरबी विशेष नावानी त्याला पुकारले जाते.) याचे नाव घेऊन शास्त्र शुध्द पद्धतीने जबा (कापणे) म्हणजेच त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कापणे व हृदयाचे ठोके चालू राहतील, हे पाहणे याचे कारण सजीवांच्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात रोगजंतू असतात ते रक्त या वाटे हृदयाचे ठोके चालू असल्यामुळे वाहून जाते यास ‘हलाल मटण’ म्हटले जाते. तसेच जे मानव अन्न खातो ते स्वतःच्या मेहनतीने कमविलेले असावे, याला हलाल रोजी म्हटली जाते. कोणाला फसवून लांडी लबाडी करुन लुटून व्याजा द्वारे कमावलेले पैसे यास ‘हराम’ म्हणजे निषिद्ध मानले गेलेले आहे.

खंडण

१. ‘हलाल’ या अरबी शब्दाचा इस्लामनुसार अर्थ वैध, स्वीकार्य, मान्यताप्राप्त असा आहे. कुराणातील ५६ आयतींमध्ये ‘हलाल’ शब्दाचा उल्लेख आलेला आहे, तर २१ आयतींमध्ये आहाराच्या संदर्भात उल्लेख आहे. ‘कोणत्या गोष्टी हलाल आहेत ? आणि कोणत्या हराम आहेत ?’, यांचा स्पष्ट उल्लेख आहे. ‘हदीस’ ग्रंथामध्येही हलालचा विविध प्रकारे कसा वापर केला जाऊ शकतो, याचा उल्लेख आलेला आहे.

२. पशूबळी देणारा मुसलमानच असला पाहिजे आणि त्याने ‘बिसमिल्लाह अल्लाहू अकबर’ म्हटले पाहिजे, प्राण्याचे मुंडके मक्केतील काबाच्या दिशेने केलेले असले पाहिजे. प्राण्याचे संपूर्ण रक्त वाहून जाऊ दिले पाहिजे. हे करणे ‘हलाल’ मांसासाठी अनिवार्य आहे. तसे नसेल, तर ते मांस ‘हलाल’ धरले जात नाही. या गोष्टींमुळे सध्या मांस व्यापार हा बहुतांश मुसलमानांच्या कह्यात गेला आहे आणि बहुतांश हिंदु खाटिक समाज बेरोजगार झाला आहे.

३. इस्लामनुसार हलाल मांसच ग्राह्य आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे आज गैरइस्लामी देशांतही ७० ते ८० टक्के मांस हे हलाल पद्धतीने, म्हणजे वरील निकषांचे पालन करूनच मिळवले जाते.

टीका

मग आता हलाल कि हराम हा प्रश्न आला कोठे ? व हे प्रमाणपत्राचा विषय तरी काय ? भारतीय संविधानाने आपल्याला आपण काय खावे व काय खाऊ नये याचा अधिकार दिलेला आहे.

खंडण

१. मांसाशी संबंधित असलेली ‘हलाल’ ही संकल्पना अन्य अनेक उत्पादने वस्तू आदींना लागू करून त्या माध्यमातून ‘जगाला इस्लाम बनवण्याचे’ स्वप्न बघणार्‍या आतंकवादी संघटनांनी या माध्यमातून भारतासह जगातील अनेक आस्थापनांना त्यांचे उत्पादन मुसलमानांनी घ्यावे यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास बाध्य केले आहे. एका प्रमाणपत्राला ६० सहस्र रुपये अशा प्रकारे प्रतिवर्षी त्याचे नूतनीकरण करणे, याखेरीज प्रत्येक देशात त्यांचे उत्पादन विकण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संस्थांची प्रमाणपत्रे घेणे बंधनकारक केले आहे. या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावून भारताच्या अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करील, एवढी समांतर अर्थव्यवस्था या आतंकवादी संघटनांनी उभारली आहे. हा सर्व पैसा आतंकवादी संघटनांना शस्त्रास्त्रे पुरवणे आणि आतंकवाद्यांचे खटले लढणे यांसाठी वापरला जात आहे. भारतात ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही प्रमाणपत्र देणारी संघटना भारतभरात बाँबस्फोट केलेल्या आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी साहाय्य करत आहे.

२. उपवासाचे पदार्थ, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने बनवणारी आस्थापने हल्दीराम, पतंजलि यांसारख्या आस्थापनांची उत्पादने आदींचा हलाल या गोष्टींशी सुतराम संबंध नाही. असे असतांना त्यांनी व्यवसायासाठी हे प्रमाणपत्र घेतले आहे. भारतीय रेल्वे, क्रिकेट बोर्ड आदीही याला बळी पडले आहेत. रुग्णालये, इमारती, संकेतस्थळे यांनीही हे प्रमाणपत्र घेणे चालू केले आहे. वास्तविक भारत शासनाची आय.एस्.ओ. आणि एफ्.एस्.एस्.आय. (अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) ही प्रमाणपत्रे उपलब्ध असतांना यांची आवश्यकता नाही. सरकारनेही यावर बंदी आणलेली नाही.

टीका

हे निवेदन वजा पत्र चिपळूणात दिले जात आहे म्हणजे चिपळूणात व्यापारी (आता हलाल म्हटले की, एका विशिष्ट धर्माशी निगडित येतो अपवाद परदेशात मुस्लिम नावाने बहुतांशी गुजराती व ब्राम्हण संचालक असलेल्या बीफ व इतर मटण निर्यात करणार्‍या मोठ्या कंपन्या वगळता) हा हलाल कमविलेला पैसा म्हणजेच चिपळूणातील व्यापारी देशद्रोही किंवा आतंकवादी कामासाठी पाठवितात का ? असे कोणते पुरावे आहेत की जे चिपळूणात सर्वधर्मिय एकमेकांच्या गळ्यात गळे घालून, एकमेकांच्या सणामध्ये सुख दुःख वाटून एकोप्याने राहतात त्यांची मने कलुषित करणे किंवा संशय निर्माण करण्याकरिता ही खेळी खेळली जात आहे का ?

कृपया निवेदन देणार्‍यांनी याची विस्तृत माहिती द्यावी की ते या षढयंत्राला बळी पडले आहेत ?

खंडण

१. चिपळूण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हलाल प्रमाणपत्र घेणार्‍या आस्थापनांच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन कोणताही भेदभाव निर्माण करण्यासाठी नसून येणार्‍या हलाल जिहादच्या भयावह संकटापासून राष्ट्राला वाचवण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी, हलाल प्रमाणपत्र देण्या-घेण्यावर बंदी घालावी, या उद्देशाने देण्यात आले.

२. आतंकवाद्यांनी हलाल प्रमाणपत्र घेण्याची बळजोरी करून निर्माण केलेल्या समांतर अर्थव्यवस्थेचा धोका हा संपूर्ण राष्ट्राला आहे. त्यामुळे हलाल उत्पादने न घेण्यासाठी जनजागृती केली जात आहे. इथे भेदभाव करणे, मने कलुषित करणे आदी संकुचित कारणे नसून उलट राष्ट्राच्या आणि राष्ट्रातील सर्व जनतेच्या रक्षणासाठी हलाल प्रमाणपत्रातून निर्माण झालेल्या आतंकवादाला पोसणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेविषयी जागृती करणे, हा उद्देश आहे.

(संदर्भ : संकेतस्थळ – hindujagruti.org आणि हिंदु जनजागृती समितीचा ग्रंथ ‘भारतीय अर्थव्यवस्थेवर नवे आक्रमण ? – हलाल जिहाद ?’)