कराचीतील चिनी नागरिकांवरील आक्रमणाचे अन्वेषण चीन स्वतः करणार !

कराची (पाकिस्तान) – या वर्षी एप्रिलमध्ये कराची विद्यापिठात झालेल्या बाँबस्फोटांचे पाकिस्तान अन्वेषण करत असतांना आता चीननेही पाकिस्तानसह या आक्रमणाचे अन्वेषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये आक्रमण करून चिनी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. या आक्रमणाचा उद्देश पाकिस्तानचे चीनसोबतचे संबंध बिघडवणे आणि पाकिस्तानला आर्थिक अडचणी निर्माण करणे, हा असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे  आक्रमण एका पाकिस्तानी महिला आत्मघातकी आक्रमणकर्त्याने केले होते. या आक्रमणात चिनी वंशाच्या शिक्षकांसह स्थानिक चालकही मारला गेला होता. यानंतर इतरही अनेक आतंकवादी आक्रमणे झाली. या वेळीही चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. नोव्हेंबर २०१८ मध्ये कराचीतील चिनी वाणिज्य दूतावासावर आक्रमण झाले होते. यानंतर जून २०२० मध्ये कराची स्टॉक एक्सचेंजवर आक्रमण झाले.
चिनी नागरिकांवरील आक्रमणांमागे बलुचिस्तान मुक्ती सेनेचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. बलुचिस्तान मुक्ती सेनेने चीनला बलुचिस्तानपासून दूर रहाण्याची चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

यावरून चीनचा पाकवर काडीचाही विश्‍वास नाही, हे सिद्ध होते !