शिवलिंगाला संरक्षण मिळण्यासंदर्भातील हिंदूंची भूमिका सर्वोच्च न्यायालय ऐकणार

वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरण

नवी देहली – वाराणसी येथील ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने हिंदु पक्षाला मोठा दिलासा देत तेथे सापडलेल्या शिवलिंगाला संरक्षण देण्याच्या विषयावर सुनावणी करणार असल्याचे मान्य केले. याआधी ‘केवळ १२ नोव्हेंबरपर्यंत शिवलिंगाला संरक्षण देण्यात येईल’, असे न्यायालयाने म्हटले होते. १२ नोव्हेंबरला या विषयावर न्यायालय हिंदु पक्षाची भूमिका ऐकून निर्णय देणार आहे.

१. मे २०२२ मध्ये न्यायालयीन अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ज्ञानवापी मशिदीच्या तळघराचे अन्वेषण करण्यात आले होते. तेव्हा तेथे प्राचीन शिवलिंग सापडले होते. ते काशी विश्‍वनाथाचे मूळ शिवलिंग असल्याची स्पष्ट भूमिका हिंदु पक्षाने मांडली होती, तर मुसलमान पक्षाने त्यास विरोध केला होता.

२. या मासाच्या आरंभी वाराणसी येथील एका न्यायालयाने ‘शिवलिंगाचे ‘कार्बन डेटिंग’ चाचणी (कोणत्याही गोष्टीचे आयुर्मान मोजण्यासाठी करण्यात येणारी वैज्ञानिक प्रक्रिया) आणि अन्य वैज्ञानिक संशोधन करण्याची हिंदु पक्षाची मागणी फेटाळली होती. ‘अशा प्रक्रिया केल्याने शिवलिंगावर विपरीत परिणाम होईल’, असे न्यायालयाचे म्हणणे होते.