|
संभाजीनगर – ‘विवाहित महिलेला घरातील कामे करण्यास सांगणे, ही क्रूरता नाही, तसेच घरातील सुनेने केलेल्या कामांची तुलना मोलकरणीच्या कामाशी होऊ शकत नाही’, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी नोंदवले आहे, तसेच सारंग आमले यांच्यासह त्याच्या आई आणि बहीण यांच्या विरोधात नांदेड पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हाही रहित करण्याचा आदेश खंडपिठाने दिला आहे.
नांदेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर चालू असलेल्या प्रकरणाची कार्यवाही खंडपिठाच्या निर्णयामुळे स्थगित होणार आहे. नांदेड येथील सृष्टी हिचा विवाह पुणे येथील सारंग आमले (वय ४१ वर्षे) यांच्याशी झाला होता. सृष्टी हिच्या तक्रारीवरून पती सारंग, सासू सरोज (वय ७१ वर्षे) आणि नणंद दीप्ती आठल्ये (वय ४३ वर्षे) यांच्याविरुद्ध नांदेड येथील भाग्यनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तिघांनी गुन्हा रहित करण्यासाठी संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. ‘आपल्याकडून मोलकरणीप्रमाणे काम करून घेतले जाते, हे एक प्रकारचे क्रौर्य आहे’, असे तक्रारीत म्हटले होते. विवाहित स्त्रीला घरकामासंबंधी विचारणा केली असेल, तर ती कुटुंबाच्या उद्देशानेच केली जाते. त्यातून संबंधित स्त्रीला मोलकरीण समजणे असा अर्थ होत नाही. जर विवाहितेला घरकाम करायचे नसेल, तर तिने विवाहापूर्वीच सांगणे आवश्यक आहे. अशी अडचण त्यातून दूर झाली असती’, असे खंडपिठाने स्पष्ट केले. सासरच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत पत्नीने चारचाकी वाहन खरेदीसाठी ४ लाख मागितल्याचा, तसेच पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचे म्हटले होते.