कर्नाटकातील अरबी शाळांमध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नाही ! – शिक्षणमंत्री

कर्नाटकातील २०० अरबी शाळा सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नाहीत

बेंगळुरू – कर्नाटकात कार्यरत असलेल्या अरबी शाळांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले होते. या अरबी शाळांमध्ये सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले आहे, असे कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी सांगितले. राज्यात अरबी शिकवणार्‍या २०० अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा अन् महाविद्यालये आहेत. त्यापैकी बहुतेक उत्तर कर्नाटक आणि किनारी प्रदेशात आहेत. अरबी शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर योग्य नसल्यामुळे त्यांना इतर शाळांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करता येत नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री नागेश यांनी सांगितले.

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश

कर्नाटक राज्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अरबी शाळांच्या सर्वेक्षणासाठी एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य शिक्षण विभागाच्या देखरेखीखाली हे सर्वेक्षण केले जात आहे. साहाय्यक आयुक्तांना त्याचा आढावा घेण्यास सांगितले असून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.