पाकिस्तानचा ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये समावेश झाल्यानंतर भारतातील आतंकवादी आक्रमणाचे प्रमाण अल्प झाले ! – भारत

मुंबई – आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ (एफ्.ए.टी.एफ्.) या संस्थेच्या ‘करड्या सूची’मध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये) पाकिस्तानचा समावेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणांचे प्रमाण अल्प झाले आहे, अशी माहिती भारत सरकारचे संयुक्त राष्ट्रांतील संयुक्त सचिव सफी रिझवी यांनी दिली. भारताने आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विशेष बैठकीत रिझवी बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आतंकवादविरोधी समितीने याविषयीची चौकशी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांचा अशा प्रकारच्या सूचीमध्ये समावेश करते.

रिझवी पुढे म्हणाले की, पाकिस्तान ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर आतंकवादी कारवाया वाढण्याची शक्यताही वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष २०१५ मध्ये ८, तर वर्ष २०१६ मध्ये १५ आक्रमणे झाली होती. वर्ष २०१७ मध्ये ती अल्प होऊन ८ वर आली आणि वर्ष २०१८ मध्ये ती आणखी अल्प झाली. वर्ष २०१९ मध्ये पुलवामा येथे मोठे आतंकवादी आक्रमण झाले, तर वर्ष २०२० मध्ये कुठलेच मोठे आक्रमण झाले नाही. वर्ष २०२१ मध्ये मोठी आक्रमणे वाढू लागली आणि वर्ष २०२२ मध्ये ती चालूच राहिली.