रशियातील महिला घटस्फोटित पती अन् तरुणी माजी प्रियकर यांचे सैन्याला पाठवत आहेत पत्ते !

रशियामध्ये बलपूर्वक सैन्यभरती !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले नाही. रशियामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य भरती करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारकडून पुरुषांना बलपूर्वक सैन्यात भरती करवून घेतले जात आहे. याचा काही जण अपलाभही उठवत आहेत, असे दिसून येत आहे. ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे किंवा ज्या तरुणींना प्रियकराने सोडले आहे, अशा महिला आणि तरुणी अशा पती आणि प्रियकर यांचे पत्ते सैन्याला कळवत आहेत. ‘त्यांना अद्याप सैन्यात का भरती करण्यात आले नाही ?’, असे विचारत त्यांची भरती करण्यास सांगत आहेत. सैन्यही या पत्त्यावर जाऊन संबंधितांना सैन्यात भरती करवून घेत असल्याचे दिसत आहे. या पुरुषांनी घटस्फोट घेतल्यानंतर मुलांच्या संगोपनाचा खर्च करणे बंद केले आहे.

१.  महिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या पूर्वीच्या पतींना युद्धासाठी पाठवले पाहिजे, जेणेकरून ते देशाची सेवा करू शकतील.

२. श्रीमती बोरिसोवा म्हणाल्या की, माझ्या मुलीचे वडील जवळच रहातात. दुर्दैवाने त्यांना अद्याप सैन्याचे भरतीसाठी समन्स मिळालेले नाहीत. मला वाटते जर ते त्यांच्या मुलीचे दायित्व घेऊ शकत नसतील, तर त्यांनी किमान देशाचे दायित्व तरी घ्यावे.

३. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या सैन्यभरतीला रशियात मोठा विरोध होत आहे. अनेक वृद्ध आणि आजारी लोकांनाही लढाईला पाठवण्यात आले आहे. याआधी लाखो पुरुष देश सोडून पळून गेले आहेत, जे उरले आहेत ते घरात लपून बसले आहेत.