काँग्रेसचा देशविघातक तोंडवळा !

काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ची ‘विदेशी योगदान नियमन कायद्यां’तर्गत विदेशी अनुदान मिळण्याची अनुज्ञप्ती रहित करण्यात आली आहे. या संस्थेकडून आर्थिक अपव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर्ष २०२० मध्ये गृहमंत्रालयाने बनवलेल्या एका आंतर-मंत्रालयीन समितीने अन्वेषण केले. यानंतर वर्ष २००५ ते वर्ष २००९ या काळात चीन सरकार आणि चिनी दूतावास यांच्याकडून अडीच कोटी रुपये ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला मिळाल्याचे समोर आले. यामुळे ‘राजीव गांधी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असल्याचा आव आणणार्‍या काँग्रेसचा खरा तोंडवळा या निमित्ताने लोकांसमोर आला आहे. शत्रूराष्ट्र असलेल्या चीनकडून पैसे घेऊन तोच पैसा भारतविरोधी कामांसाठी वापरला जात होता का ? या दृष्टीनेही यापुढील अन्वेषण झाले पाहिजे. परकीय नियमन कायद्यान्वये अनुज्ञप्ती रहित होण्याचे हे पहिलेच उदाहरण नसून यापूर्वीही वर्ष २०१४ मध्ये देशातील ८ सहस्र ९७५ स्वयंसेवी संस्थांची नोंदणी केंद्रशासनाने रहित केली होती. यातील अनेक संस्थांना परदेशातून निधी मिळत होता आणि या संस्थांनी सलग ३ वर्षे त्याचा हिशोब दिला नव्हता. यातील अनेक संस्थांची नोंदणी ही ‘सामाजिक काम करणारी संस्था’ म्हणून होती; प्रत्यक्षात या संस्था अनेक नियमबाह्य कामे करतांना आढळल्या. यातील बहुतांश संस्था या काँग्रेसच्या कार्यकाळात स्थापन झाल्या होत्या. त्यामुळे या संस्थांना निधी कुठून येतो ? त्याचे ते काय करतात ? असे त्यांना कुणी विचारतच नसे. भारतात असणार्‍या ख्रिस्ती स्वयंसेवी संस्थांना अमेरिका, युरोप येथून, तर इस्लामी संस्थांना अरब राष्ट्रांतून मोठ्या प्रमाणात निधी येतो. ख्रिस्ती संस्थांना येणारा निधी कोट्यवधी रुपयांत असतो. काँग्रेसच्या छत्रछायेत वाढलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याच प्रकारे परदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असे आणि त्यांच्याकडून केंद्रशासनाला ही माहिती दिली जात नसे.

आर्थिक घोटाळेबाजांकडून निधी !

केंद्रीय गृहमंत्रालय, वित्त मंत्रालय आणि केंद्रीय अन्वेषण पथक यांच्या अधिकार्‍यांनी जेव्हा ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ संस्थेने आयकर प्रविष्ट करतांना कोणत्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आहे का ? किंवा विदेशातून प्राप्त झालेल्या पैशांचा दुरुपयोग केला आहे का ? हे पाहिले, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली. त्यामुळे ‘राजीव गांधी फाऊंडेशन’च्या माध्यमातून ख्रिस्तीधर्मीय सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून धर्मांतराला प्रोत्साहन दिले जात होते का ? तसेच शत्रूराष्ट्राला गुप्त माहिती पुरवली जात होती का ? याचेही अन्वेषण होणे अत्यावश्यक आहे. ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा, आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा अध्यक्ष, तसेच भारताच्या विरोधात कारवाया करणारा आणि सध्या पसार असणारा धर्मांध झाकीर नाईक याच्याकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. झाकीर नाईक याची संघटना धर्माच्या आधारावर युवकांना आतंकवादी कारवाया करण्यासाठी चिथावणी देणे, भारतातील विविध भागांत धार्मिक द्वेष वाढवून तरुणांना देशविरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करणे, देशाची एकता-अखंडता यांचा धोका निर्माण होईल यांसह अनेक अवैध कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले होते. त्यामुळे अशांकडून निधी घेणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या काँग्रेसकडून झाकीर नाईकच्या कृत्यांचे समर्थन केल्यासारखेच आहे. ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला असा निधी मिळत असल्यानेच झाकीर नाईक काँग्रेसच्या कार्यकाळात उजळमाथ्याने फिरत होता आणि अनेक तक्रारी येऊनही त्याच्यावर कारवाई होत नव्हती. ‘पंजाब नॅशनल बँकेत’ सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा करणारे मेहुल चोक्सी यांच्याकडून १० लाख रुपये, ‘येस बँके’त आर्थिक घोटाळे करणारे राणा कपूर यांच्याकडून ५० लाख रुपये घेण्यात आले असून घोटाळ्याचा आरोप असलेल्या जिग्नेश शहाकडून ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला निधी मिळाला आहे. तरी भारतविरोधी कारवाया करणार्‍या आणि अनेक आर्थिक घोटाळेबाजांकडून निधी घेणार्‍या राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्यासह डॉ. मनमोहन सिंह, पी. चिदंबरम्, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी-वढेरा या सर्व विश्वस्तांचेही सखोल अन्वेषण करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भाजप सरकारने पुढाकार घ्यावा !

काँग्रेसला जनतेने विसर्जित करावे !

गांधीवधाचे कारण पुढे करून दंगली घडवून ब्राह्मणांचे हत्याकांड, वर्ष १९८४ मध्ये देहलीत झालेले शिखांचे हत्याकांड या प्रमुख उदाहरणांसह काँग्रेसने प्रत्येक सत्ताकाळात अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण, भ्रष्टाचार याच सूत्रांवर काम केले. १०० कोटी रुपयांच्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ घोटाळ्यात अधिक अन्वेषण होत आहे, हे लक्षात आल्यावर अन्वेषण न होण्यासाठी देशभरात ‘ईडी’, ‘सीबीआय’ यांसारख्या संस्थांच्या कार्यालयाकडे जाणारे मार्ग रोखले. राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रेत केवळ ख्रिस्ती पाद्र्यांची भेट घेऊन जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचे काम करतात. काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !