‘राजीव गांधी फाऊंडेशन’कडून आर्थिक अपव्यवहार झाल्याने विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित !

  • केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई !

  • चीनकडून मिळत होते अर्थसाहाय्य !

  • सोनिया गांधी आहेत संस्थेच्या अध्यक्षा

नवी देहली – केंद्रशासनाने गांधी घराण्याशी संबंधित स्वयंसेवी संस्था ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला मिळणार्‍या विदेशी निधीची अनुज्ञप्ती रहित केली आहे. या संस्थेकडून आर्थिक अपव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर वर्ष २०२० मध्ये गृहमंत्रालयाने बनवलेल्या एका अंतर-मंत्रालयीन समितीने चौकशी केली. या संस्थेला चीनकडून होणार्‍या अर्थसाहाय्यासंबंधीचे अन्वेषणही करण्यात आले. त्यामध्ये तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

१. सोनिया गांधी या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’च्या अध्यक्षा आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम्, कांग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी वढेरा या संस्थेच्या विश्‍वस्तपदी आहेत.

२. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर जुलै १९९१ मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची स्थापना करण्यात आली. वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत स्वास्थ्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, महिला बालविकास, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचा या संस्थेकडून दावा केला जातो.

३. अन्वेषण समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालय, वित्त मंत्रालय तसेच केंद्रीय अन्वेषण पथक यांच्या अधिकार्‍यांचा समावेश होता. या अन्वेषणातून संस्थेने आयकर प्रविष्ट करतांना कोणत्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी केली आहे का किंवा विदेशातून प्राप्त झालेल्या पैशांचा दुरुपयोग केला आहे का ? हे पहाण्यात आले. यामध्ये दोषी आढळल्याने या संघटनेला ‘विदेशी योगदान नियमन कायद्यां’तर्गत विदेशी अनुदान मिळण्याची अनुज्ञप्ती रहित करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसची ‘राजकीय’ अनुज्ञप्तीही रहित करण्यासाठी आता जनतेने आवाज उठवायला हवा !