बनावट प्लेटलेट्स विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश : १० जणांना अटक

(प्लेटलेट्स म्हणजे एक लहान रक्तपेशी यामुळे रक्ताला घट्टपणा येतो.)  

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – बनावट प्लेटलेट्स विकून रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी टोळीच्या म्होेरक्यासह १० जणांना अटक केली. आरोपींकडून प्लाझ्माच्या (रक्तपेशी ज्यामध्ये तरंगतात त्या रंगहीन भागाच्या) १८ पिशव्या, बनावट प्लेटलेट्सच्या ३ पिशव्या आणि १ लाख २ सहस्र रुपये रोख जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडून ३ दुचाकी आणि १३ भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत.

१. या टोळीचा म्होरक्या राघवेंद्र सिंह उर्फ राहुल पटेल आहे. तो इतर आरोपींना सोबत घेऊन काम करत होता.

. वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेशकुमार पांडे यांनी सांगितले की, आरोपी रक्तपेढीतून प्लाझ्मा विकत घेत होते. एका पिशवीत ३५० मिली प्लाझ्मा असतो. यानंतर रिकाम्या पिशवीमध्ये ५०-५० मिली प्लाझ्मा भरून ते प्लेटलेट्स म्हणून तीन ते ५ सहस्र रुपयांना विकले जात होते. टोळीच्या सदस्यांना वेगवेगळी  कामे सोपवण्यात आली होती. काही जण प्लाझ्मा आणण्याचे काम करायचे, तर काही जण रुग्ण शोधण्याचे काम करत असत.

ग्लोबल हॉस्पिटलशी संबंधाविषयी अन्वेषण चालू

बनावट प्लेटलेट्स विकणार्‍या टोळीचा झालवा येथील टाळे ठोकलेल्या ग्लोबल हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेटर यांच्याशी कोणताही संबंध होता का, याविषयी अन्वेषण चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक पांडे यांनी सांगितले. ‘काही रुणालयाचे कर्मचारी आमच्या संपर्कात होते’, याची आरोपींनी स्वीकृती दिली आहे. या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून अनेक गरजू लोक प्लेटलेट्ससाठी आरोपींशी संपर्क साधत असत. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे, असे अधीक्षक पांडे यांनी सांगितले.