चीनने गलवान खोर्‍यातील भारत-चीन संघर्षाच्या घटनेचा व्हिडिओत केला समावेश !

चीनकडून करण्यात आलेल्या कामाचा आढावा सांगणारा व्हिडिओ !

बीजिंग (चीन) – चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (‘सीसीपी’च्या) चालू असलेल्या २० व्या अधिवेशनामध्ये चीनकडून केलेल्या कामाची माहिती देणारा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यामध्ये जून २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाखच्या गलवान खोर्‍यात झालेली हिंसक चकमकही दाखवण्यात आली. व्हिडिओमध्ये चिनी सैन्याचे कमांडर की फाबाओ दोन्ही हात पसरून भारतीय सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये चीनचा अंतराळ कार्यक्रम, नवीन प्रवासी जेट आणि कोविडचा प्रतिबंध यांचा उल्लेखही करण्यात आला आहे.

‘द हिंदू’ या चीनधार्जिण्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बीजिंगमधील ‘द ग्रेट हॉल ऑफ द पीपल’मध्ये अनुमाने अर्ध्या घंट्याचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला. गलवान खोर्‍यातील संघर्षात भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. भारत सरकारने त्याची औपचारिक माहिती दिली होती. दुसरीकडे चीनने त्याचे किती सैनिक मारले गेले, हे कधीही सांगितले नाही. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचे वृत्त संकेतस्थळ ‘द क्लॅक्सन’ने एका अन्वेषण अहवालात म्हटले होते की, पूर्व लडाखमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत ३८ चिनी सैनिक मारले गेले. यानंतर काही दिवसांनी ‘द न्यूज वीक’ या अमेरिकी मासिकानेही या घटनेच्या संदर्भात एक वृत्त प्रकाशित केले होते. गलवान खोर्‍यातील १५ जून २०२० या दिवशी झालेल्या हिंसक चकमकीत ६० चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

जून २०२० मध्ये गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांनी अनेक चिनी सैनिकांना ठार मारण्याचा अतुलनीय पराक्रम गाजवला होता. चीनच्या या पराभवाला त्याने कधीच स्वीकारले नसले, तरी भारताने या निमित्ताने चीनच्या धूर्तपणाला उघडे पाडणे आवश्यक !