अंतरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार कृतज्ञताभाव असलेला ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

कु. श्रीनिवास देशपांडे

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्रीनिवासविषयी आलेले लिखाण वाचून त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येणे 

श्रीमती मेघना वाघमारे

‘२२.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कु. श्रीनिवासची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध झाली होती. श्रीनिवास सकाळी प्रसाद ग्रहण करण्यासाठी भोजनकक्षात गेल्यानंतर साधकांनी त्याचे कौतुक केले. काही साधकांनी त्याला सांगितले, ‘‘तुझ्याविषयीचा लेख वाचून आमचा भाव जागृत झाला.’’ नंतर ‘स्वतःविषयी काय लिखाण आले आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी श्रीनिवासने दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला घेतले. ते वाचतांना श्रीनिवासचा भाव जागृत होऊन त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले.

२. ‘साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले प्रेम करत आहेत’, या विचाराने त्याच्या डोळ्यांतून कृतज्ञतेने भावाश्रू येणे

तो स्वयंपाकघरात सेवा करत असलेल्या त्याच्या आईकडे धावत गेला आणि तिला खोलीत घेऊन आला. श्रीनिवास आईच्या गळ्यात पडून रडू लागला. तो रडत म्हणाला, ‘‘आई, परात्पर गुरुदेव किती आणि केवढे देतात गं ! मी तर काहीच केले नाही, तरी ते मला एवढे देत आहेत. सगळे साधक माझे कौतुक करत आहेत. या साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच माझ्यावर प्रेम करत आहेत. मला पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे.’’

३. यवतमाळ येथे असतांना स्वतःला भावाश्रू येत नसल्याविषयी आईला विचारणे आणि आता स्वतःविषयीचे लिखाण वाचल्यावर कृतज्ञताभावामुळे अश्रू आल्यावर ‘देवाने तीही इच्छा पूर्ण केली’, याबद्दल अधिकच भाव जागृत होणे

त्याच्या बालमनाला वाटणारी कृतज्ञता त्याला शब्दांतून व्यक्त करता येत नव्हती. नंतर त्याची आई त्याला म्हणाली, ‘‘यवतमाळ येथे असतांना तू म्हणायचास ना, ‘तुमच्यासारखा भाव जागृत होऊन मला रडू का येत नाही ?’ आज भगवंताने तुझी ती इच्छाही पूर्ण केली.’’ त्यावर तो आईला बिलगून अधिकच रडू लागला. भगवंताने त्याची इच्छा पूर्ण केल्याने त्याचा कृतज्ञताभाव अधिकच दाटून आला होता. त्या वेळी त्याच्या मनात स्वकौतुकाच्या विचाराचा लवलेशही नव्हता. परात्पर गुरुदेव आणि भगवंत यांच्याप्रती कृतज्ञताभाव अंतरात ठेवून तो पुढील सेवेला गेला.

४. अल्प अहं आणि परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव असणे

त्या दिवशी दुपारी मी त्याला विचारले, ‘‘श्रीनिवास, दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये तुझ्याविषयी एवढे छापून आले आहे. तुला ते वाचून काय वाटले ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी ते पूर्ण वाचूच शकलो नाही. मला रडू आले.’’ तेव्हा मला त्याच्यातील अल्प अहं आणि परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जाणवला.

५. श्रीनिवासची फलकावर लावलेली गुणवैशिष्ट्ये आणि साधकाने त्याचे कौतुक केल्याचे वाचून त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणे

श्रीनिवास आश्रमात आल्यापासून त्याच्यात होणार्‍या पालटांविषयी आणि त्याच्या गुणांच्या संदर्भात अनेक साधक मला सांगतात. एका साधकाने त्याची लिहून दिलेली गुणवैशिष्ट्ये सर्वांना शिकण्यासाठी फलकावर लावली होती. मला याविषयी समजल्यानंतर मी श्रीनिवासला ती सूत्रे वाचायला सांगितली. नंतर दुसर्‍या दिवशी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

मी : आमच्या बाळाविषयी फलकावर छान छान लिहिले आहे ! तू वाचलेस का ?

श्रीनिवास : कुणाविषयी गं आजी ? सायलीताईविषयी (श्रीनिवासची मोठी बहीण) लिहिले आहे का ?

(त्याचे ते विचारणे, अगदी सहज आणि भोळेपणाचे होते. ‘त्याने फलकावरील सूत्रे वाचली होती’, हेही तो विसरला होता. त्याविषयी त्याला आठवण करून दिली.)

मी : काय वाटले ते वाचून ?

श्रीनिवास : हं, ते का ? काही नाही ! परात्पर गुरुदेवच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेतात. मला कुठे काय येते ? आश्रमातील साधकांचे पाहून मी प्रयत्न करतो.

– श्रीमती मेघना वाघमारे (श्रीनिवासची आजी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक