तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांकही घोषित !
कोल्हापूर – सणांच्या काळामध्ये प्रवाशांची लूट करणार्या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आदेश काढला आहे. अवाच्या सवा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार प्रविष्ट करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांकही घोषित केला आहे. ‘शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीटदर घेता येणार नाही’, असे परिपत्रकात म्हटले आहे.
१. विशेषकरून गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या कालावधीमध्ये सुटीला गावी जाणार्यांची संख्या लाखांमध्ये असते. हीच संधी साधून खासगी वाहनधारकांकडून तिकीटदर मुद्दाम वाढवले जातात. त्यामुळे सामान्यांची त्यामधून पुष्कळ लूट होते.
२. यंदाच्या वर्षीची दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार प्रविष्ट करण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक घोषित करण्यात आला आहे.
३. ‘खासगी वाहतूकदारांनी निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतूकदारावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करावी, तसेच वेळोवेळी दिलेल्या आदेशाची कार्यवाही करण्यात यावी’, असे निर्देश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना दिले आहेत.
‘प्रवाशांना अडचण आल्यास याविषयी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ८९९९८ ०३५९५ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि [email protected] या ‘ई-मेल आयडी’वर, तसेच परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या [email protected] या ई-मेल आयडीवर आपली तक्रार करावी’, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे. |