आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.

।। श्रीकृष्णाय नम: ।।

भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे –

     यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
     ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ।। अ.४ श्लोक ३७

अर्थ- अर्जुना, ज्याप्रमाणे धगधगता अग्नी इंधनाला भस्मसात् करतो त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात् करतो.

कर्मांना म्हणजे अनेक जन्मांतील कर्मांच्या भोगणे उरलेल्या पुण्य-पापरूपी संचित फळांना नष्ट करतो. राहिले संचित. आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.

अनंत आठवले

पूर्वार्ध

कर्मांची फळे कोणाला भोगावी लागतात?

मनुष्य चांगली-वाईट कर्मे करतो ती नक्की कोणामुळे घडतात, ते पाहूया.

१. इंद्रिये – मनुष्य इंद्रियांनी कर्मे करतो, उदा. दान हाताने देतो, चोरी हाताने करतो. मग दानाचे पुण्य किंवा चोरीचे पाप हाताला भोगावे लागेल का? नाही ! सर्व इंद्रिये जड (क्रियाशीलचैतन्यरहित) असतात. न दान देण्याचा निर्णय त्यांचा असतो, न चोरी करण्याचा. असेच सर्व इंद्रियांचेही असते. त्यामुळे इंद्रिये पुण्य-पापासाठी उत्तरदायी नसतात.

२. मन – मनात वेगवेगळे विचार येत राहतात. एखादे चांगले काम करण्याचे, एखादे वाईट काम करण्याचे विचार मनात येतात. पण हे केवळ विचारच असतात. तसले काम करण्याचा निर्णय मनाचा नसतो. त्यामुळे त्याच्या परिणामाचे दायित्व मनाचे नसते.

३. बुद्धी – मनांतील विचारांवर निर्णय बुद्धी घेते. एखादे कार्य करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय बुद्धीचा असतो. पण मन आणि बुद्धीसुद्धा जड (क्रियाशीलचैतन्यरहित) असतात. मानसिक किंवा बौद्धिक कार्य करण्यासाठी लागणारे चैतन्य त्यांचे नसते.  मनाला विचार करण्यासाठी आणि बुद्धीला निर्णय घेण्यासाठी लागणारे चैतन्य जीवात्म्याकडून मिळते.

४. जीवात्मा – आत्मा हा ईश्वराचा शरीरात असणारा अंश. ईश्वर ज्ञानमय चैतन्यस्वरूप आहे. म्हणून आपल्यात अशा आत्म्यामुळे जाणण्याची, करण्याची क्षमता आहे.

ईश्वराचा अंश असलेला आत्मा शरीरात आला, जडाशी जुडला की तो त्रिगुणांच्या प्रभावामुळे शरीराला आपले मानू लागतो. शरीरातील सर्व घटकांशी तो जुडतो, त्या जड पदार्थांशी त्याची घट्ट गाठ पडते. ह्याला चिज्जडग्रंथी म्हणतात, चैतन्याची जडाची बसलेली गाठ. अशा चैतन्याला शरीरातला जीवात्मा म्हणतात. त्या जीवात्म्याच्या चैतन्यामुळे देह, मन, बुद्धी इत्यादींचे सर्व कार्य घडते.

५. आत्मा – मूळ स्वरूपात तो आत्मा नित्यशुद्धबुद्धमुक्त आहे. तो न कर्मे करतो, न कर्मांचा विचार करतो, न कर्मे करण्याचा निर्णय घेतो. कर्मे आत्मा करत नसल्याने कर्मफळाचे दायित्व आत्म्यावर नाही.

६. विज्ञानमय आत्मा – शास्त्रांमध्ये शरीरात पाच कोश मानले गेले आहेत. ते आहेत – अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. हे सर्व कोश त्या जीवात्म्यामुळे सचेतन होऊन कार्यरत असतात. त्या जीवात्म्याच्या चैतन्याच्या आधारे बुद्धी निर्णय घेते. अशा बुद्धीशी संबद्ध, विज्ञानमय कोशातून कार्यरत असणार्‍याला विज्ञानमय आत्मा म्हणतात. ह्या विज्ञानमय आत्म्याच्या निर्णयाने चांगले-वाईट कर्म केले जाते. त्यामुळे सर्व पुण्य-पापाचे दायित्व विज्ञानमय आत्म्याचे असते, कर्मफळ विज्ञानमय आत्मा भोगत असतो.  मुण्डकोपनिषद्मध्ये मुण्डक ३ खंड २ मन्त्र ७ वरील आपल्या भाष्यात आद्यशंकराचार्यांनी विज्ञानमय आत्म्याविषयी त्रोटक उल्लेख केला आहे – ‘कर्मणां तत्फलार्थत्वात्’ म्हणजे ‘कर्मे त्या विज्ञानमय आत्मालाच फळ देतात.’

मृत्यूनंतर जीवात्मा जेव्हा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो, तेव्हा मन, बुद्धीतील (चित्तामध्ये संग्रहित) संस्कारांसह जातो; म्हणजे आधीच्या जन्मांचे पुण्य-पापांचे संस्कार संचितरूपाने बरोबर जातात.

तात्पर्य, आत्म्याला न इच्छा असतात, न ममता, न अहंकार. तो नित्यशुद्धबुद्धमुक्त आहे. तो देह, मन, बुद्धीशी जुडतो तेव्हा कर्मे घडतात आणि त्या कर्मांची फळे आत्म्याला नव्हे तर बुद्धीशी जुडलेल्या, म्हणजे विज्ञानमय आत्म्याला भोगावी लागतात.

एकदा हे लक्षात आले की उत्तरार्धात सांगितलेले, आत्मज्ञानाने संचित कर्मफळे कशी नष्ट होतात,  हे कळणे शक्य होईल.

उत्तरार्ध

टीप – विषय स्पष्ट करण्यासाठी लेखनाची प्रश्नोत्तरशैली अधिक उपयोगी वाटल्याने पुढे अवलंबिली आहे.

आत्मज्ञानाने सर्व संचित कर्म भस्मसात् होते

प्रश्न – कर्मांना भस्म करणे म्हणजे काय?

उत्तर- कर्मे तर झालेली आहेत. इथे ‘कर्म’चे तात्पर्य आहे त्या कर्मांचे पुण्य-पापरूपी फळ. आत्मज्ञानाने ते पुण्य-पापरूपी संचित भस्मसात् होईल म्हणजे नष्ट होईल.

प्रश्न – तुम्ही ‘संचित भस्मसात् होईल’ असे पूर्वार्धाच्या आरंभी म्हटले आहे. गीतेमध्ये तर भगवान् श्रीकृष्णांनी ‘ज्ञानाग्नीने सर्व कर्मे भस्मसात् होतात’ असे म्हटले आहे.

उत्तर – कर्मफळांचे तीन प्रकार आहेत. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित. ह्या विषयावर आधीच विस्तृत लेख लिहीला आहे (संदर्भ – अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध), पण थोडक्यात पुन्हा सांगतो. प्रारब्ध ह्या जन्मात भोगून संपते. आत्मज्ञान झाल्याने योग्य आचरण घडल्यामुळे क्रियमाण बनतच नाही.

प्रश्न- प्रारब्ध आणि क्रियमाणाचे निराकारण तर झाले, पण आत्मज्ञान होण्याआधी केलेल्या कर्मांना आणि आधींच्या जन्मांच्या संचित कर्मांना ( पुण्य-पापांना) आत्मज्ञान कसे भस्मसात् करील?

उत्तर – अंत:करणातील अशुद्धींमुळे अयोग्य कर्मे घडून पुण्य-पाप बनते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ममता आणि अहंकार ह्या त्या अशुद्धी आहेत. हे दोष कुठे असतात? हे दोष आपल्या आत्म्यात नसतात. हे दोष जीवात्म्याद्वारा सचेतन झालेल्या मन आणि बुद्धीमध्ये आणि त्यांचे संस्कार चित्तामध्ये असतात, हे आपण ह्या लेखाच्या पूर्वाधात पाहिले.

प्रश्न – ह्या दोषांचा आणि त्यांच्या संस्कारांचा नाश कसा होईल? ह्या दोषांच्या संस्कारांना नष्ट करण्याचे उपाय काय आहेत?

उत्तर – शास्त्रांमध्ये ज्या वेगवेगळ्या साधना सांगितल्या जातात, त्या ईश्वरप्राप्तीचे किंवा मोक्षप्राप्तीचे उपाय नाहीत. ते चित्तशुद्धीचे उपाय आहेत. भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे –

‘योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं  त्यक्त्वात्मशुद्धये ।।’ अ. ५ श्लोक ११

म्हणजे  ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग, ध्यानयोग इत्यादी योगांची आचरणरूपी जी विभिन्न कर्मे आहेत त्यांना त्या योगांचे योगी आत्मशुद्धी, चित्तशुद्धीसाठी करतात. तेव्हा कोणत्या तरी योगाने साधना करून चित्तशुद्धी होईल, म्हणजे दोष नष्ट होतील.

प्रश्न – पण मूळ प्रश्न तर संचित कर्मांना नष्ट करण्याविषयी आहे.

उत्तर- त्यावरच तर येत आहोत. ज्या प्रमाणे स्वभावदोष आत्म्यामध्ये नाहीत तर जीवात्म्याच्या मन एवं बुद्धीमध्ये आणि त्यांचे संस्कार चित्तामध्ये असतात, त्याचप्रमाणे पूर्वजन्मांचे पुण्य-पापांचे संस्कारसुद्धा चित्तामध्ये असतात, आत्म्यात नाही. ज्याप्रमाणे आपण साधना करून स्वभावदोष घालवतो, आत्मशुद्धी करतो, त्याच प्रमाणे पुण्य-पापांच्या संस्कारांनासुद्धा घालवायचे आहे.

प्रश्न – ह्या म्हणण्याला काही शास्त्रीय आधार आहे का? शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे का?

उत्तर – १. स्वत: भगवान् श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितले आहे की ज्ञानाग्नी सर्व कर्मे भस्मसात् करतो, तर विश्वास का करत नाही? दुसर्‍या शास्त्रांचे प्रमाण का मागता? पण शास्त्रांमधील प्रमाण मागितलेच आहेत, तर ते सुद्धा सांगतो.

२. मुण्डकोपनिषद्मध्ये सांगितले आहे –

              यदा पश्य: पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् ।
              तदा विद्वान्पुण्यपापे विधूय निरञ्जन: परमं साम्यमुपैति ।। मुण्डक ३ खण्ड १ मन्त्र ३ ।।

अर्थ – जेव्हा पाहणारा, ब्रह्माचेही (ब्रह्मदेवाचे) उत्पत्तीस्थान असलेल्या त्या सुवर्णवर्ण जगत्कर्ता ईश्वर-पुरुषाला पाहतो तेव्हा विद्वान् पुण्य-पाप धुवून टाकून (पुण्य-पापांचा त्याग करून) निर्मल होऊन अत्यंत समतेला प्राप्त होतो.

हा अर्थ जरा नीट समजून घ्यावा लागेल. ईश्वराचे स्वरूप पूर्णपणे जाणले की ईश्वराचा अंश असलेल्या आपल्या शुद्ध आत्म्याचा पुण्य-पापाशी संबंध नाही, हे पूर्वार्धात सांगितल्याप्रमाणे उमगते. देह, मन, बुद्धी, चित्त इत्यादी मळाला आपल्यापासून वेगळे जाणून मनुष्य निर्मळ म्हणजे शुद्धचित्त होतो. ईश्वराला आपल्या आत्मारूपाने पाहू लागल्याने प्रकृतीतील  बुद्धीच्या ( विज्ञानमय आत्म्याच्या) कार्याच्या परिणामस्वरूप प्राप्त पुण्य-पापापासून विलग होतो आणि ईश्वराशी परम समतेला म्हणजे अभिन्नतेला प्राप्त होतो.

३. तैत्तिरीयोपनिषद्मध्ये हा विषय वेगळ्या प्रकारे सांगितला आहे-

‘—एतं ह वाव न तपति । किमहं साधु नाकरवम् । किमहं पापमकरवमिति । स य एवं विद्वानेते आत्मानं स्पृणुते । उभे ह्येवैष एते आत्मानं स्पृणुते । य एवं वेद ।—’ वल्ली २ अनुवाक ९ मन्त्र १

अर्थ –(जो अद्वैत आनंदमय ब्रह्माला जाणतो -) त्या विद्वानाला ‘मी शुभकर्म का केले नाही, मी पापकर्म का केले’ अशी चिंता सतावत नाही. त्यांना ( हे पुण्य-पापच त्रासाचे कारण आहेत-) असे जाणणारा जो विद्धान् आपल्या आत्म्याला प्रसन्न किंवा सबळ करतो, त्याला हे दोन्ही आत्मस्वरूपच दिसतात.

हे समजायला थोडे अवघड वाटू शकते. अव्यक्त निर्विशेष ज्ञान-चैतन्यरूप अनंत ब्रह्मामधूनच सविशेष देह, जग इत्यादी कार्य व्यक्त होते आणि त्यातच विलीन होते. ते ब्रह्म मीच असल्याने ( ‘अयमात्मा ब्रह्म’ माण्डूक्योपनिषद् मन्त्र २. अर्थ- हा आत्मा ब्रह्म आहे. ) ते पुण्य-पाप माझ्यापासून वेगळे नाहीत, हे जाणून विद्वान् त्या पुण्य-पापाचे महत्त्व शून्य करून आत्म्याला प्रसन्न किंवा बलवान् करतो. (आत्मा अविकारी असल्याने तो प्रसन्न किंवा बलवान् होत नसतो. आत्म्याहून इतर गोष्टींचे महत्त्व न्यून करत शून्य करणे हे आत्म्याला प्रसन्न किंवा बलवान् करणे आहे.)

प्रश्न – उपनिषदात ‘त्याला हे दोन्ही (पुण्य-पाप) आत्मस्वरूपच दिसतात’ असे का म्हटले आहे?

उत्तर – हे थोडे समजून घ्यावे लागेल. पहिली गोष्ट अशी की ‘सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलानिति-’ (छान्दोग्योपनिषद् अ. ३ खण्ड १४. मन्त्र १) म्हणजे हे सर्वकाही ब्रह्म आहे; त्यातूनच उत्पन्न होणारे, त्यातच विलीन होणारे आणि त्यातच क्रिया करणारे आहे. म्हणून पुण्य-पापसुद्धा आत्मस्वरूप आहे. दुसरे असे की भय दुसर्‍यापासून असते, स्वत:पासून नाही. (‘द्वितीयाद्वै भयं भवति ।’ – बृहदारण्यकोपनिषद् १.४.२. – अर्थ – भय दुसर्‍यापासून असते.) पुण्य-पाप तर आत्मस्वरूपच आहे, त्यांना काय घाबरायचे? तिसरे असे की दुसर्‍यामधून नको असलेल्या गोष्टी काढणे कठीण असते. त्या मानाने स्वत:त, आत्मस्वरूपात त्यांना नगण्य करणे सोपे असते.

४. स्वामी अखंडानंद सरस्वती त्यांच्या ‘कर्मयोग’ ह्या (हिंदी) ग्रंथात गीता अ.३ श्लोक ४० वरील भाष्यात सांगतात की ‘एखादी चूक झाली तर पश्चात्ताप करा- प्रायश्चित्त घ्या. पण पश्चात्ताप दीर्घकाळापर्यंत धारण करू नये’. असे सांगण्याचे कारण हेच असावे की ते कृत्य शुद्धआत्म्याकडून घडलेलेच नसते. ते जीवात्म्याच्या बुद्धीने त्रिगुणांच्या प्रभावाखाली येऊन ठरवलेले असते. त्याचा पश्चात्ताप सतत मनात राहिला तर त्याचा संस्कार चित्तात राहून पुढील जन्माचे कारण बनेल.

तात्पर्य – आत्मज्ञान झाल्याने पुनर्जन्माचे कारण बनणारे सर्व कर्मांचे पुण्य-पापरूपी संचित अशा प्रकारे भस्मसात् म्हणजे नष्ट होते.

टीप – सतर्कता- हा लेख वाचून अपसमज होऊन वाचणार्‍याची हानी होऊ शकते. काही जणांना ‘उपनिषदांत सांगितलेले उपाय अगदीच सोपे आहेत. हे तर आम्ही सहज करू शकतो’ असे वाटेल. अध्यात्मात प्रगत असलेल्यांना ‘ही स्थिती तर आम्ही केव्हाच गाठून तिच्या पलीकडे गेलेलो आहोत’ अशी निश्चिती असेल. अशाने ते स्वत:ची हानी करून घेतील. अशी स्थिती प्राप्त करणे खूप खूप कठीण आहे.

आत्मपरीक्षण करून आपण हे साध्य केले आहे का, हे पाहू शकतो. आयुष्यात आपण एखादे पुण्यकर्म केलेले असते. त्याच्या आठवणीने आपण सुखावतो. आयुष्यात आपली एखादी मोठी हानी झालेली असते, त्याचे दु:ख असते. कधी कोणीतरी मोठा अपमान केलेला असतो, त्याचे शल्य असते. कधी मोठ्या संकटात सापडलेले असतो. त्यावेळची भीती, घालमेल आठवली की मन उद्विग्न होते. कधी एकादी खूप मोठी चूक, मोठे पाप केलेले असते, त्याचा पश्चात्ताप असतो. अशा सुख, दु:ख, शल्य, घालमेल, पश्चात्तापाच्या प्रसंगांच्या आठवणीने आपण विचलित होतो की नाही, आपली शांती, प्रसन्नता ढळते की नाही, हे बघावे. आपण मन आणि बुद्धीच्या पार गेलो आहोत की नाही, हे कळेल. उगीच स्वत:विषयी अपसमज, भ्रम बाळगला तर पुढे प्रगती करण्याकडे कल होणार नाही, आपली हानी होईल.

लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक

– अनंत आठवले, श्रीकृष्णजयंती, १८.०८.२०२२

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।