पुरुषाचा विवाह झाल्‍याची माहिती असतांनाही एखाद्या स्‍त्रीने त्‍याच्‍या शारीरिक संबंध ठेवणे बलात्‍कार ठरत नाही ! – केरळ उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय

नवी देहली – एखाद्या महिलेने विवाहित पुरुषाशी त्‍याच्‍या विवाहाची माहिती असतांनाही शारीरिक संबंध ठेवले, तर तो बलात्‍कार ठरत नाही. अशा प्रकरणांत स्‍त्री आणि पुरुष यांच्‍यातील शारीरिक संबंध प्रेम आणि आवड असते. त्‍यामुळे ते लग्‍नाचे आमीष दाखवून बलात्‍कार केल्‍याच्‍या कक्षेत येत नाही, असा निर्णय केरळ उच्‍च न्‍यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करतांना दिला. या प्रकरणी न्‍यायालयाने याचिकाकर्त्‍यावर झालेला बलात्‍काराचा आरोप फेटाळतांना हे स्‍पष्‍ट केले. एका ३३ वर्षीय व्‍यक्‍तीने त्‍याच्‍यावरील लग्‍नाचे आमीष दाखवून बलात्‍कार केल्‍याचा गुन्‍हा रहित करण्‍यासाठी याचिका प्रविष्‍ट केली होती. सुनावणीमध्‍ये तरुणीला तिचा मित्र पूर्वीपासूनच विवाहित असल्‍याचे ठाऊक असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. त्‍यानंतरही दोघांनी आपापसांतील संबंध अव्‍याहत चालू ठेवले. एवढेच नाही, तर तरुणाने घटस्‍फोट घेतल्‍यानंतरही दोघांतील संबंध चालूच होते.