हिंदूंनो, ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे होणारा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी संघटित व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

बीड येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती वर्धापनदिन सोहळ्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !

बीड (महाराष्ट्र) – ‘हलाल’ हे केवळ एक प्रमाणपत्र आहे’, या भ्रमात न रहाता हिंदूंनी हा आर्थिक जिहाद थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर संघटित होऊन आंदोलन उभे करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. २ ऑक्टोबर या दिवशी जैन भवन येथे समितीने आयोजित केलेल्या द्विदशकपूर्ती वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी आणि व्यासपिठावर श्री. राजन बुणगे आणि श्री. मनोज खाडये

या वेळी व्यासपिठावर कीर्तनकार ह.भ.प. प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी, समितीचे बीड जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे हेही उपस्थित होते. या वर्धापनदिन सोहळ्यातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य संघटितपणे करण्याचा निर्धार उपस्थित धर्मप्रेमींनी केला. या कार्यक्रमाची सांगता ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा’ घेऊन करण्यात आली.

भारतियांनी धर्माचरण करून अध्यात्मशास्त्र समजून घेणे आवश्यक ! – ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी, कीर्तनकार

ह.भ.प. प्रज्ञाताई रामदासी

भारतीय नागरिक पाश्‍चात्त्यांच्या विकृतीकरणाच्या आहारी गेल्याने त्यांना महान हिंदु  संस्कृतीचा विसर पडलेला आहे; मात्र अन्यत्र कुठेही उपलब्ध नसलेले अध्यात्मशास्त्र समजून घेण्यासाठी भारताकडे विदेशातील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे भारतियांनी याचे महत्त्व समजून घेऊन अध्यात्मशास्त्र समजून घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.

उपस्थित मान्यवर : भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. दत्ता परळकर, श्री. जयसिंग चुंगडे (मामा) यांच्यासह धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धापनदिनाला उपस्थित धर्मप्रेमी

हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत

१. अधिवक्ता महेश धांडे, संस्थापक अध्यक्ष, जगदंब प्रतिष्ठान, बीड – देवतांचे विडंबन, धर्माचरण, ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे आम्हाला हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून समजले. माझ्या अखेरच्या श्‍वासापर्यंत समवेत कार्य करीन.

२. अधिवक्ता स्वप्नील गलधर, भाजपचे मंडळ अध्यक्ष, बीड – समितीचे कार्य पुष्कळ चांगल्या प्रकारे चालू आहे. समितीचे कार्यकर्ते मन लावून धर्मसेवा करत आहेत. ‘माझे आयुष्य समितीच्या कार्यकर्त्यांना लागो; परंतु समितीचे कार्य सातत्याने चालू राहो’, अशी मी देवाला प्रार्थना करतो.

विशेष – या कार्यक्रमात ‘हलाल सक्तीविरोधी’ कृती समितीची स्थापना करण्यात आली.