गोवा : झुआरीनगर येथील रोहिंग्या मुसलमानांना सांकवाळ पंचायतीकडून बनावट कागदपत्रे !

माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा

झुआरीनगर हे रोहिंग्या मुसलमानांसाठी प्रजनन केंद्र

पणजी – झुआरीनगर हे रोहिंग्या मुसलमानांसाठी प्रजनन केंद्र आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते नारायण नाईक यांनी केला आहे. सांकवाळ पंचायत बनावट जन्मदाखला देण्यात गुंतली असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. ‘पोलिसांनी भंगारअड्ड्यांवर छापे टाकून त्यांच्या मालकांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यास झुआरीनगर येथे मोठ्या संख्येने असलेले रोहिंग्या मुसलमान समोर येतील. त्यामुळे पोलिसांनी तेथे छापा टाकावा’, असे आवाहनही नाईक यांनी पोलिसांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१८ मध्ये सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती की, सर्वांत मोठा झोपडपट्टीचा भाग असलेले झुआरीनगर हे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांचे एक प्रजनन केंद्र आहे. तेथील रोहिंग्या मुसलमानांना सांकवाळ पंचायतीकडून सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात. निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्ड देखील पंचायतीकडून पुरवले जाते.

(सौजन्य : QUICK GOA NEWS)

झुआरीनगरमध्ये बनावट जन्मदाखला नोंदणी केली जात आहे आणि त्याचा पुरावा पारपत्र कार्यालयाने सांकवाळ पंचायतीला पाठवला आहे. ही कागदपत्रे जोडून पोलीस, उपजिल्हाधिकारी आणि इतर प्राधिकरणे यांच्याकडे मी तक्रार केली आहे. मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असलेल्या आणि ज्यांची कागदपत्रे पडताळली गेलेली नाहीत, अशा लोकांद्वारे चालवल्या जाणार्‍या अवैध भंगार दुकानांच्या विरोधात कुणीही कृती करत नाही. सरकारने मला पाठिंबा दिला, तर मी त्यांना ही भंगार दुकाने दाखवून बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि जन्मदाखले यांच्या संदर्भातील माझे आरोप सिद्ध करू शकतो, असेही नाईक यांनी म्हटले आहे.