उद्या ९ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘कोजागरी पौर्णिमा’ आहे. त्या निमित्ताने…
१. ‘कोजागरी’चा भावार्थ
‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.
२. कोजागरी पौर्णिमेचा उपासनाविधी
जेव्हा निशीथ काळ (पौर्णिमेचा रात्रीचा विशिष्ट काळ) असेल, ती पौर्णिमा या व्रतासाठी ग्राह्य धरावी. त्या वेळी ऐरावतावर (हत्तीवर) आरूढ असलेला इंद्र आणि महालक्ष्मी यांची पूजा करून उपवास करावा. रात्रीच्या वेळी त्यांना गंध आणि पुष्प अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. १०० किंवा आपल्या क्षमतेनुसार अधिक दिवे प्रज्वलित करून ते देव, मंदिर, उद्याने, तुळशी वृंदावन आणि अश्वत्थ वृक्षाच्या खाली अन् घरात लावले जातात.
३. कोजागर व्रत
पहाटे स्नानादी आवरून इंद्राचे पूजन करावे. ब्राह्मणांना तूप आणि साखरमिश्रित खिरीचे भोजन द्यावे. त्यांना वस्त्र, दक्षिणा आणि सोन्याचे दीप दिल्याने अनंत फळांची प्राप्ती होते. या दिवशी ब्राह्मणांकडून ‘श्रीसूक्त आणि लक्ष्मीस्तोत्र’ यांचे पठण करावे. कमळाचे बीज, बेल किंवा खीर यांच्या साहाय्याने दशांश हवन करावे. (दशांश हवन म्हणजे १०० वेळा स्तोत्र म्हटल्यावर १० वेळा कमळ बीज, बेल इत्यादी अग्नीत समर्पित करणे)
(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, ऑक्टोबर २००४)