भारतातील ४ ‘कफ सिरप’ची चौकशी

आफ्रिकेतील गॅम्बिया देशामध्ये झालेल्या ६६ मुलांच्या मृत्यूमागे हे सिरप असल्याचा संशय !

नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील ४ ‘कफ सिरप’वर संशय व्यक्त केल्यानंतर भारत सरकारने त्यांची चौकशी चालू केली आहे.

१. आफ्रिकेतील गॅम्बिया देशामध्ये ६६ मुलांचा त्यांना देण्यात आलेल्या कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यातील ४ कफ सिरप भारतातील असल्याचे लक्षात आल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात भारतातील औषध नियंत्रक संस्था ‘डी.सी.जी.ए.’ला सतर्कतेची चेतावणी दिली आहे. त्यानंतर ‘डी.सी.जी.ए.’ने हरियाणा प्रशासनाशी चर्चा करून चौकशी चालू केली आहे. हरियाणामध्ये उत्पादित होणारी ही कफ सिरप विदेशात विशेषत: आफ्रिकी देशांमध्ये निर्यात होतात.

२. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सर्दी आणि खोकला यांसाठी घेतल्या जाणार्‍या या औषधांमध्ये प्रोमेथॅझाईन ओरल सोल्युशन, कोफेक्समॅलिन बेबी कफ सिरप, मेकऑफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रिप एन् कोल्ड सिरप या ४ औषधांचा समावेश आहे. या औषधांच्या उत्पादक आस्थापनांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.