निर्माल्य गोळा करण्यासाठी ठेकेदार कचर्‍याने भरलेले डंपर वापरतात !

  • हिंदु जनजागृती समितीची मुंबई महानगरपालिकडे तक्रार

  • निर्माल्यासाठी कचर्‍याचे डंपर वापरणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – निर्माल्य गोळा करण्यापूर्वी डंपर किंवा ट्रक स्वच्छ करूनच वापरावेत, असे मुंबई महानगरपालिकेचे स्पष्ट निर्देश आहेत. असे असतांना काही ठेकेदार निर्माल्य गोळा करण्यासाठी कचरा भरलेले डंपर आणत आहेत. याविषयी ४ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीकडून मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. ‘गणेशोत्सवाच्या काळात हा निंदनीय प्रकार घडला असून दसर्‍याच्या वेळी देवीच्या विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करतांना पुन्हा असा प्रकार होऊ नये. यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करावी’, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

काही भाविकांनी याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात असे प्रकार घडले आहेत. संबंधित ट्रकवर ९९८७०९४२३१, ९९८७८७४११८ हे दूरभाष क्रमांक होते. त्यांवर संपर्क करून माहिती घेतली असता हा ट्रक वरळी येथील संतोष पाटील यांचा असल्याचे समजले. देवतांचे निर्माल्य अशा प्रकारे कचर्‍याच्या गाडीत भरणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.

दसर्‍याच्या वेळी असा प्रकार होणार नाही, याच दक्षता घ्यावी !

५ ऑक्टोबर या दिवशी दसरा आहे. दसर्‍यानंतर मुंबईच्या समुद्रांमध्ये देवीच्या मूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येते. त्या वेळी पुन्हा असा प्रकार होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना वेळीच सूचना द्यावी. तरीही असे प्रकार करून कुणी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असेल, तर त्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

ठेकेदार आर्थिक फसवणूक करत आहे का, याची चौकशी व्हावी !

आधीच कचरा भरलेले डंपर आणून त्यात निर्माल्य गोळा केल्याचे दाखवून ठेकेदार अधिक फेर्‍या दाखवत आहेत का ? अतिरिक्त फेर्‍या दाखवून ठेकेदार महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी चौकशी करण्याची मागणी समितीने निवेदनात केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ संघटनेला अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? निर्माल्यासाठी कचर्‍याच्या डंपरचा वापर केला जातो, हा धर्मद्रोही प्रकार महापालिकेला दिसत नाही का ?