उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सिद्धी दिनेश बाबते ही या पिढीतील एक आहे !
भाद्रपद शुक्ल चतुर्थी (३१.८.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील कु. सिद्धी दिनेश बाबते हिचा १२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०१६ मध्ये ‘कु. सिद्धी दिनेश बाबते उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’ , असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५६ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.८.२०२२) |
१. स्वयंशिस्त
‘कु. सिद्धीमध्ये ‘तत्परता आणि सातत्य’ हे गुण आहेत. तिला रात्री झोपायला उशीर झाला, तरीही ती सकाळी ठरलेल्या वेळेत उठते. स्नान केल्यानंतर ती देवाची पूजा करून आणि वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून शाळेत जाते. शाळेतून घरी आल्यावर गृहपाठ करणे, गायन आणि भरतनाट्यम् नृत्य यांच्या वर्गाला जाणे, असे स्वतःचे सर्व नियोजन करून त्याप्रमाणे करते. ती नियोजनानुसार कृती करतांना कधीही कंटाळा करत नाही.
२. घरकामांत साहाय्य करणे
दळणवळण बंदीच्या काळात आम्हाला सर्व कामे घरीच करावी लागायची. तेव्हा सिद्धी सकाळी लवकर उठून केर काढणे, भांडी घासणे, भांडी जागेवर लावणे, पलंगावरची चादर पालटणे, भाज्या चिरून देणे इत्यादी कामांत मला साहाय्य करायची.
३. प्रांजळ
सिद्धीचा स्वभाव पुष्कळ बोलका आहे. ती तिच्या संपर्कातील प्रत्येकाशी सहजतेने बोलते. तिच्याकडून काही चूक झाल्यास ती मला प्रांजळपणे सांगते.
४. कलागुण
गुरुदेवांच्या कृपेने तिला विविध कला जोपासण्याची संधी मिळाली आहे.
४ अ. सात्त्विक चित्रे काढणे : ती प्रतिदिन किमान एक तरी चित्र काढते. ती श्रीकृष्णाचे मोरपीस काढते. त्यात तिने केलेली मोरपिसांची रंगसंगती अतिशय भावपूर्ण असते. तिला पेन्सिलने विविध रेखाचित्रे (स्केचिंग) काढणे आवडते.
४ आ. उत्तम आकलनक्षमता : तिने कोणत्याही गाण्याची धून ऐकल्यावर ती धून पेटीवर वाजवण्याचा प्रयत्न करते. प्रत्यक्षात तिला पेटी शिकण्याचा वर्ग लावला नाही.
४ इ. ती भरतनाट्यम् नृत्याच्या चौथ्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे आणि ती गायनाच्या तिसर्या परीक्षेत (प्रवेशिका पूर्ण) जिल्ह्यातून प्रथम आली होती.
५. भावपूर्ण देवपूजा करणे
सिद्धीला बालपणापासूनच तिच्या आजोबांच्या समवेत देवपूजा करण्याची आवड होती. आताही तिला वेळ मिळाल्यावर ती देवाची मनोभावे पूजा करते. ती देवाला फुले वहातांना फुलांची भावपूर्ण रचना करते.
६. व्यष्टी साधना गांभीर्याने करणे
सिद्धी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रार्थना आणि कृतज्ञता सांगते. आढाव्यात सांगितलेले साधनेचे दृष्टीकोन ती लक्षपूर्वक ऐकते आणि त्याप्रमाणे तळमळीने प्रयत्न करते. ती स्वतःमध्ये असलेल्या स्वभावदोषांचे चिंतन करून त्याचा मला आढावा देते.
७. विविध सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे
अ. आमच्या घरी संत निवासाला असतांना सिद्धी त्यांना ‘हवे-नको’, ते पहाते. ती त्यांना नवीन पदार्थ बनवून देते.
आ. ती माझ्या समवेत ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी येते. ती ‘साठा मोजणे आणि नंतर हिशोब करणे’, या सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण करते.
इ. ती माझ्या समवेत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करते.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या अनुसंधानात रहाणे
अ. सिद्धी प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात असते. ‘मी गुरुदेवांना मनातील सर्व सांगते’, असे ती मला सांगत असते.
आ. ती शाळेत जातांना श्रीकृष्णाला समवेत घेऊन जाते. ‘मधल्या सुटीत आमच्या समवेत श्रीकृष्ण खेळतो. झाडाखाली बसतो’, असे ती मला सांगते. ती घरी आल्यावर मोरपीस केसांत अडकवून ‘मी कृष्णाची राधा आहे’, असे म्हणून फिरते.
९. कु. सिद्धीमध्ये असलेले स्वभावदोष
अ. स्वतःच्या मतावर ठाम रहाणे
गुरुमाऊलीच्या कृपेनेच मला अशा बालसाधिकेचा सहवास मिळाला, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. अक्षरा दिनेश बाबते, (सिद्धीची आई, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), संभाजीनगर (२६.४.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |