पाकच्या पंतप्रधानांच्या बैठकीतील गोपनीय संभाषण उघड

संभाषणामध्ये भारतातून वीज प्रकल्प मागवण्यात येणार असल्याचा उल्लेख

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरी झालेल्या एका बैठकीची, तसेच शरीफ आणि एक अधिकारी यांच्यातील संभाषणाचीही एक ध्वनीफीत उघड झाली आहे. संभाषणात अधिकारी शाहबाज यांना सांगत आहे, ‘‘नवाज शरीफ यांचा जावई भारतातून वीज प्रकल्प  आयात करणार आहे. हा व्यवहार थांबला पाहिजे.’’ यावर पाकिस्तानच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ‘या ध्वनीफितीमुळे पाकच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही’, असा आरोप केला आहे. ही ध्वनीफीत आता ऑनलाईनही उपलब्ध झाली आहे. यामध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासह इतर काही नेत्यांचा आवाज आहे.

इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’चे नेते आणि माजी मंत्री फवाद चौधरी म्हणाले की, आमच्या पंतप्रधानांच्या घरातील इंटरनेट डेटा चोरीला जात आहे. हे देशाच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. आता सुरक्षा आणि परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित डेटाही शत्रूंच्या हाती लागला आहे.

संपादकीय भूमिका

एकीकडे भारताविरुद्ध जिहाद पुकारायचा आणि दुसरीकडे भारतातून गुपचूप प्रकल्प आयात करायचे, ही पाकिस्तानी नेत्यांची ढोंगबाजीच होत !