गुरुरूपात साक्षात श्रीविष्णु लाभले असल्याने प्रयत्न भरभरून करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनाविषयीचे अनमोल विचारधन !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. रज-तम प्रधान वातावरणातही साधकांची तळमळीने काळजी घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविना कोण आहे ?

गुरुदेवांचा प्रत्येक श्वास हा साधकांसाठीच असतो. त्यांना प्रत्येक क्षणी साधक आणि साधकच डोळ्यांसमोर दिसतात. गुरूंचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक विचार हा त्यांच्या साधकांसाठीच असतो. ‘आज साधकांसाठी काय करू ?’, ‘समष्टीसाठी काय देऊ ?’, अशीच त्यांची तळमळ असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळे आणि त्यांच्या प्रीतीमुळेच साधकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र पालट होत आहेत. साधकांचे जीवन आनंदी होऊन ते या घोर कलियुगात रज-तम वातावरणात रहात असूनही मोकळा श्वास घेत आहेत. सनातनचा प्रत्येक साधक आणि त्यांचे कुटुंब यांचीही ते काळजी घेत आहेत. अशी काळजी घेणारे या पृथ्वीवर दुसरे कोण आहे ?

२. गुरूंप्रती कृतज्ञता किती वाटते, त्यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात !

श्रीगुरूंनी आपल्याला भरभरून दिले आहे. त्यांच्याप्रती आपल्याला किती प्रमाणात कृतज्ञता वाटते, यावर साधनेतील प्रयत्न अवलंबून असतात. साधनेत अल्पसंतुष्टता नको. ‘पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत’, याची जाणीव ठेवूया. ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, हाच गुरूंचा संकल्प आहे. सर्व साधक अध्यात्मात कधी पुढे पुढे जाण्याची गुरुदेव वाट पहात आहेत. आपण केलेले लहान लहान प्रयत्न पाहूनही गुरूंना आनंद होतो. ते प्रयत्नही गुरूंच्या कृपेनेच झालेले असतात. अर्जुनाने जेव्हा माशाचा डोळा भेदण्याचे ध्येय ठेवले, त्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तू सतर्क रहा आणि ध्येयाकडे लक्ष दे. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की, ‘श्रीकृष्णा, तू काय करणार ?’, त्या वेळी श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तू जे करू शकत नाही, ते मी करणार !’’ (म्हणजेच पाण्यातील माशाचा डोळा भेदण्यासाठी पाणी स्थिर ठेवण्याचे कार्य भगवान श्रीकृष्ण करणार होता.)

३. गुरुच आपला मोठा आधार आहेत. साधना करणारा जीव हा पृथ्वीवरील सर्वांत श्रीमंत जीव आहे. त्याच्या श्रीमंतीचे मोजमाप करता येणार नाही.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


आपत्काळ वेगाने येत असल्याने व्यष्टी साधना वाढवा !

आपत्काळ वेगाने येत आहे. प.पू. गुरुदेव नेहमीच सांगतात, ‘‘पाणी नाकापर्यंत आले आहे. त्यानंतर संधीच मिळणार नाही.’’ यासाठी व्यष्टी साधना आताच वाढवली पाहिजे. आपल्याला केवळ माध्यम बनायचे आहे आणि बाकी सर्व गुरुच करून घेणार आहेत. माध्यम बनण्यासाठी मन आणि बुद्धी या सर्वांची शुद्धी झाली पाहिजे.

साधनेचा स्तर वाढल्यावर आपण परेच्छेने वागायला लागतो. साधकांमध्ये क्षमता आहे; म्हणून प.पू. गुरुदेवांनी आपल्याला साधनेचे प्रयत्न करायला सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याकडून प्रयत्न होणार नाहीत, असे कधीच नसते. अल्पसंतुष्ट न रहाता सतत पुढे जाता आले पाहिजे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


साधनेतील तळमळीचे महत्त्व

अ. गुरुकृपेने साधनेचे क्रियमाण वापरून प्रारब्धावरही मात करू शकतो ! : आपले गुरु एवढे महान आहेत की, ते प्रत्येक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. ते प्रत्येकाला मोक्षाला घेऊन जाणारच आहेत. गुरूंवर अपार श्रद्धा ठेवून आपण साधनेचे क्रियमाण वापरूया. साधनेचे योग्य क्रियमाण वापरल्यास गुरुकृपेने आपण प्रारब्धावरही मात करू शकतो.

आ. परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल हे क्रियमाणावर अवलंबून ! : ‘सध्याचा काळ हा प्रतिकूल आहे; मात्र साधनेसाठी अनुकूल आहे. आपल्या क्रियमाणावर परिस्थिती अनुकूल कि प्रतिकूल, हे ठरत असते.

इ. मनात तळमळ असली की, साधना होते. प्रगती करण्यासाठी साधकाचे वय, लिंग (पुरुष / स्त्री), शिक्षण, सेवा यांपैकी कशाचीही मर्यादा येत नाही.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

 


झोकून देऊन साधना केल्यास हिंदु राष्ट्र येण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही !

मोक्षाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी गुरुदेवांनी आपल्याला त्यांच्या दिव्य चरणांशी आणले आहे. प्रत्येक साधकामध्ये अशी तळमळ हवी की, गुरुदेवांनी माझ्यासाठी एवढे केले आहे, तर मी गुरुचरणी किती कृतज्ञता व्यक्त करू ? गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी मी स्वत:ला किती झोकून देऊ ? ‘प्रयत्न करायला हवेत’, असा केवळ विचार नको, तर ते प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणायला हवे. खरा साधक ‘स्वतःचे काय चुकते’, ते विचारून घेऊन प्रयत्न करतो. त्यानंतर त्याचा प्रवास साधक-शिष्य-संत असा होतो. साधकांनी झोकून देऊन व्यष्टी आणि समष्टी साधना केल्यास हिंदु राष्ट्र येण्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. गुरुकृपेने ते प्रत्यक्षात शीघ्रतेने अवतरेल.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ


दिलेली सेवा मनापासून, भावपूर्ण, झोकून देऊन केली, तर ती गुरूंच्या चरणी समर्पित होणार आहे !

कोणतीही सेवा अशी करायची की, ‘ती देवाला आवडली पाहिजे’. सेवा झाल्यावर स्वत:ला एकच प्रश्न विचारायचा, ‘देवा, तुला ही सेवा आवडली का ?’ त्यावर आतून देव जसे उत्तर देईल, त्यानुसार पुढे कृती करत रहायचे. जेव्हा ‘मी केलेली सेवा देवाला आवडायला हवी’, असा विचार असतो, तेव्हा आपल्याकडून ‘आळस करणे, सवलत घेणे’, असे होत नाही. दिलेली सेवा मनापासून, भावपूर्ण आणि झोकून देऊन केली, तर गुरूंच्या चरणी का नाही समर्पित होणार ? प्रत्येक सेवा ईश्वराच्या जवळ जाण्याचे एक माध्यम आहे. सेवेच्या माध्यमातून ईश्वराचे गुण आपल्यात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ


देहासाठी जसा श्वास आवश्यक आहे, तसे साधनेसाठी सेवा आवश्यक आहे !

  • ‘स्वतःची प्रगती व्हावी’, असे वाटत असेल, तर साधकाने पूर्ण अंतर्मुख झाले पाहिजे !
  • साधकाच्या मनावर परिपूर्ण सेवा करण्याचा संस्कार झाला की, त्याचा साधनेतील वेळ वाया जात नाही !
  • साधना कृतज्ञतापूर्वक करायला हवी. सतत देवाला नमस्कार करून त्याच्या चरणी अक्षरशः लोळण घेतली की, तो मार्ग दाखवणारच !
  • ‘भगवंताला क्षणोक्षणी मन अर्पण करणे’, ही खरी कृतज्ञता आहे.
  • पदार्थात मीठ नसेल, तर जेवणाला अर्थ नसतो; तसे जीवनात भगवंत नसेल, तर जीवनाला अर्थ उरत नाही.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ