स्त्रियांना वारंवार छळणारे छुपे शत्रू (आजार) : ‘बार्थोलिन अब्सेस’ आणि नागीण !

‘डॉक्टर, परवापासून परत ‘तिकडे’ फोड आला आहे आणि कालच्या दिवसात तो फोड इतका मोठा झालाय की, भयानक दुखतंय. मला चालताही येत नाही. सकाळपासून रडूच येतंय सारखं… ही आता तिसरी वेळ आहे असे होण्याची !’, अशी तक्रार घेऊन आलेली त्रस्त मुलगी परत परत होणार्‍या ‘बार्थोलिन अब्सेस’ची बळी असते. हा आजार काय असतो, याविषयी जाणून घेऊया.

१. ‘बार्थोलिन अब्सेस’ म्हणजे काय आणि त्याची लागण कशी होते ?

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

स्त्रियांच्या योनीमार्गाच्या तोंडाशी अनेक प्रकारच्या ग्रंथी असतात. त्यातीलच एक असते, ‘बार्थोलिन ग्रंथी’ ! काही कारणाने या ग्रंथीचे तोंड बंद झाले, तर त्यात स्रवणारा द्राव बाहेर न येता आतच साठून रहातो. योनीमार्गात चांगले-वाईट असे पुष्कळ प्रकारचे जिवाणू असतात. त्यातील वाईट जिवाणूंमुळे या साठलेल्या स्रावामध्ये जंतूसंसर्ग होतो. तेथे गळू होण्यास प्रारंभ होतो. कधी कधी हा गळू मोठा होऊन आपोआप फुटतो, तर कधी प्रतिजैविके दिल्यानंतर तो अल्प होतो किंवा फुटून पू बाहेर निघून जातो. मग राहिलेली जखम पूर्ण भरते. त्यानंतर काही दिवसांनी परत स्राव साठून जंतूसंसर्ग होऊन ‘येरे माझ्या मागल्या’ अशी वेळ येऊ शकते.

ही समस्या साधारण २० ते ३० या वयोगटात अधिक प्रमाणात आढळते. हे सहन करणार्‍या स्त्रिया साहजिकच पार खचून जातात. हे ‘अवघड जागेचं दुखणं’ असल्यामुळे सहन होत नाही आणि सांगता येत नाही, अशा परिस्थितीत स्त्री अडकते. ‘बार्थोलिन’ ग्रंथीचे तोंड बंद का होते ? याविषयी निश्चितपणे माहिती सांगता येत नाही; पण मुळात ‘जंतूसंसर्ग झाल्यामुळेच हे तोंड बंद होत असावे’, अशी शक्यता असते.

२. ‘बार्थोलिन अब्सेस’चा त्रास वाढण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे उपयुक्त !

‘बार्थोलिन अब्सेस’ म्हणजे गळू झाल्यानंतर तो वेळेत फुटला नाही, तर भूल देऊन लहानशी शस्त्रक्रिया करून त्यातील पस काढून टाकला जातो. ही समस्या वारंवार उद्भवू नये; म्हणून त्याच वेळी ‘मर्कूपिलीसेशन’ नावाची लहानशी शस्त्रक्रिया केली, तर लाभ होऊ शकतो. या त्रासाला प्रारंभ झाल्यावर लगेचच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधे चालू केली, तर पुढचा त्रास वाचण्याची शक्यता असते.

गळू एका मर्यादेपर्यंतच औषधांनी अल्प होतो. त्यापुढे गेल्यास शस्त्रक्रिया अटळ असते. त्यामुळे योनीमार्गाच्या जवळ दुखणारा कोणताही फोड स्त्रीरोगतज्ञांना वेळेत दाखवणे आवश्यक आहे. कधी कधी योनीमार्गाच्या बाहेरच्या बाजूलाही असे फोड येऊन गळू होऊ शकतात. हेही वारंवार होते. अशा वेळी विशिष्ट प्रकारच्या ‘बॅक्टेरिया’मुळे जंतूसंसर्ग होतो. त्यासाठी वेगळ्या प्रकारची औषधे अधिक काळासाठी घ्यावी लागू शकतात. बर्‍याच स्त्रिया लाजेस्तव अशी दुखणी अंगावर काढतात आणि स्वतःचा त्रास वाढवून घेतात.

३. ‘बार्थोलिन अब्सेस’ हा आजार म्हणजे लैंगिक समस्या नाही !

वर नमूद केलेल्या आरोग्याविषयीच्या समस्या लैंगिक संबंधाने होणार्‍या रोगांमध्ये (‘एस्.टी.डी.’ म्हणजे ‘सेक्सुअली ट्रान्स्मिटेड डिसीजेज’मध्ये) मोडत नाहीत. बर्‍याच वेळा स्त्रिया ‘हे ‘एस्.टी.डी.’ आहे कि काय ?’, असे समजून घाबरून जातात. यांमध्ये syphilis Gonorrhea यांसारखे आजार सध्या अल्प प्रमाणात आढळतात. त्याचा आणि ‘बार्थोलिन अब्सेस’चा काहीही संबंध नाही. बुरशी जंतूसंसर्गासारखे काही संसर्ग पती-पत्नी यांना होऊ शकतात; पण त्याला ‘एस्टी’ म्हणत नाहीत.

४. नागीण म्हणजे विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा अतिशय वेदनादायक आजार !

योनीमार्गाच्या भागात होणारी नागीण हा अतिशय वेदनादायक विषाणूजन्य संसर्ग असतो. हा लैंगिक संबंधांतून पसरू (‘एस्टी’) शकतो. यामध्ये नसेलाच विषाणू संसर्ग झालेला असतो. त्यामुळे अतिशय वेदना होतात. त्याचे योग्य आणि वेळेत निदान होणे अत्यावश्यक असते; कारण यासाठी वेगळी विषाणूविरोधी औषधे द्यावी लागतात.

अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी स्त्रियांना काही गोष्टी करता येतील. योनीमार्गाच्या आजूबाजूचे केस हे ‘शेव’ किंवा ‘वॅक्स’ करू नयेत. त्यामुळे केसांची मुळे उघडी पडून जंतूसंसर्ग अधिक लवकर होऊ शकतो. या भागात ‘हेअर रिमूव्हर’ कधीच वापरू नये. ते धोकादायक आहे. यासाठी कात्रीने केस बारीक ठेवणे हाच उत्तम पर्याय आहे.

५. प्राथमिक अवस्थेत योग्य काळजी घेणे, हाच सर्व समस्यांवरील उपाय !

कोणताही दुखणारा फोड या भागात आल्यास स्त्रीरोग तज्ञांना लगेच दाखवून घ्यावे. वेळेत निदान आणि योग्य उपचार झाले, तर पुढील त्रास वाचू शकतात. योनीमार्गाची अती स्वच्छता, तसेच अस्वच्छता या दोन्ही गोष्टी जंतूसंसर्ग होण्यास कारणीभूत ठरू शकतात. योनीमार्ग हा साबण, उष्ण पाणी आणि ‘हँड शॉवर’ यांनी सतत धुणे टाळावे. दही आणि ताक यांचा आहारात समावेश करावा.

हे आहेत स्त्रियांना छळणारे काही छुपे शत्रू ! स्त्रियांनी योग्य काळजी घेतली, तर आपण त्या शत्रूंना निष्प्रभ करू शकतो. ही माहिती आपल्या जिवलगांना सांगून त्यांचा त्रासही वाचवू शकतो.’

– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे.