भारतातील चिनी आस्थापने अन्य देशांत होत आहेत स्थलांतरित !

आर्थिक व्यवहारांची चौकशी होत असल्याचा परिणाम !

नवी देहली – केंद्र सरकारकडून चिनी आस्थापनांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत शाओमी, विवो आणि ऑप्पो या चिनी आस्थापनांच्या कार्यालयांवर धाडी घालण्यात आल्या होत्या. दुसरीकडे गेल्या वर्षभरात ३०० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. याच कारणामुळे आता चिनी आस्थापने भारतातून दुसर्‍या देशात स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार भारतात मजुरीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे चिनी आस्थापने भारताऐवजी इतर शेजारील देशांमध्ये स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत.

चीन सरकारचे मुखपत्र असणार्‍या ‘ग्लोबल टाइम्स’च्या वृत्तानुसार चिनी आस्थापने  भारत सोडून इजिप्त, नायजेरिया, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांत स्थलांतरित होण्याचा विचार करत आहेत. चिनी आस्थापनांंकडून या देशांमध्ये उत्पादन प्रकल्पही चालू केले जात आहेत. चिनी आस्थापने भारतातून बाहेर गेल्यास याचा मोठा आर्थिक फटका भारताला बसू शकतो.