पोलिसांच्या गोळीबारात ५ जण ठार, ८० हून अधिक जण घायाळ

इराणमध्ये हिजाबच्या विरोधातील महिलांचे आंदोलन

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणच्या पश्‍चिम भागात हिजाबच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ८० हून अधिक जण घायाळ झाले. कुर्दिस्तान भागात हे आंदोलन चालू होते. येथील लोक अनेक वर्षांपासून वेगळ्या देशाची मागणी करत आहेत. हिजाब न घातल्यावरून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणमध्ये हिजाबच्या विरोधात महिलांकडून आंदोलन चालू झाले आहे. ‘हिजाब अनिवार्य करण्याऐवजी ऐच्छिक करावा’, अशी महिलांची मागणी आहे.

इराणमध्ये परदेशी प्रसारमाध्यमांवर बंदी आहे. असे असतांनाही कुर्दिस्तानमध्ये पोलिसांच्या अमानुषतेची वृत्ते बाहेर येत आहेत. १९ सप्टेंबरच्या संध्याकाळी उशिरा कुर्दिस्तानमधील महाबाद, दिवांदेरे, साकेज, बुकानसह अनेक शहरांमध्ये निदर्शक आणि सुरक्षादल यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला.