भ्रष्टाचाराची परिसीमा गाठल्याचे उदाहरण !
पुणे – कोंढवा खुर्द येथील ४ मजली इमारत वर्षभरात २० हून अधिक वेळा विकली गेली, तसेच त्यावर कोट्यवधींचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी या प्रकरणी ६ जणांना कह्यात घेतले आहे. या इमारतीवर इतके व्यवहार झाले असल्याची कल्पना मालक असलेल्या ४ महिलांनाही नव्हती. इमारत विक्रीसाठी मध्यस्थ असलेल्या विनय पाटील यांनी इतर महिलांना समवेत घेऊन हवेली उपनिबंधक कार्यालयात मालक महिलांचे बनावट कागदपत्र सिद्ध करून दस्त नोंदणी केली होती. तेथील उपनिबंधकाला शंका आल्याने पडताळणी केल्यानंतर एकाच प्रकारे सर्वे क्रमांकामध्ये फेरफार करून वर्षभरात २० हून अधिक व्यवहार झाल्याचे आढळून आले. ही इमारत ३ वेळा बँकांकडे गहाण ठेवून त्यावर कर्जही काढले आहे. उपनिबंधकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी मूळ मालकाच्या विरुद्धही गुन्हा नोंद केला आहे; मात्र प्रत्यक्षात मालकांना या प्रकाराविषयी काहीच माहिती नाही, असे लक्षात आले. या घटनेचे अधिक अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे करत आहेत.