पुणे – ‘गोवंश हत्याबंदीमुळे देशात लंपीचा प्रसार ?’, या मथळ्याखाली वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’च्या १५ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये एकप्रकारे गो माफिया आणि गोतस्कर यांना पाठीशी घातल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोरक्षकांकडून याला तीव्र विरोध करण्यात येत आहे. पोलिसांवरही आक्रमण करून जिवे मारण्याचे प्रयत्न गोतस्करांनी केले आहेत. या बातमीमुळे पोलीस खात्याचाही अवमान होत आहे. त्यामुळे या बातमीविषयी ‘लोकसत्ता’च्या संपादकाने क्षमा मागावी. अन्यथा समस्त गोप्रेमी, गोसेवक, गोरक्षक आणि हिंदु समाज ‘लोकसत्ता’च्या कार्यालयावर मोर्चा काढतील, अशी चेतावणी गोरक्षकांच्या वतीने देण्यात आली आहे.
पत्रकारिता नि:पक्ष आणि कायदा सुव्यवस्था राखणारी असावी; परंतु ‘लोकसत्ता’च्या संपादकांनी असे चुकीचे वृत्त लिहून गोतस्करांना पाठीशी घालून त्यांना कायद्याचे पालन न करण्याचा सल्ला दिला आहे, हे स्पष्ट होते. ‘संपादकांचे गो माफियांशी आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना ?’, ‘त्यामुळे तर असे कायदा-सुव्यवस्था बिघडवणारे वृत्त प्रसारित केले जात नाही ना ?’, असा प्रश्न स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे गोरक्षण करणारे गोरक्षक आणि गोमातेला पूजणारे गोप्रेमी यांना पडला आहे. ‘अशा चुकीच्या बातम्या प्रसारित करून त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये’ अशा संतप्त प्रतिक्रिया गोरक्षकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
नगर येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीवर गुन्हा नोंदवण्यासाठी निवेदन
नगर – येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून ‘लोकसत्ता’च्या १५ सप्टेंबरच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याविरुद्धच्या बातमीचा निषेध करण्यात आला. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठांकडून पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष श्री. मुकुंद गंधे, अधिवक्ता अभिजीत पुप्पाल, जिल्हा सहमंत्री श्री. गौतम कराळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. भारत थोरात, शहर संयोजक श्री. कुणाल भंडारी, हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. संजय आडोळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मयूर राजपुरोहित, नीलेश दातरंगे, दिनेश हिरगुडे, राजेश पवार, राजेंद्र चुंबळकर आदी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागोमाफिया आणि गोतस्कर यांना पाठीशी घालणार्या ‘लोकसत्ता’च्या संपादकाने क्षमा मागावी ! |