गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली !

आज असलेल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने…

‘शके १५०६ च्या भाद्रपद कृष्ण षष्ठी या दिवशी एकनाथ महाराजांनी संत ज्ञानदेवांच्या सूचनेवरून ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत शुद्ध करून तिचा प्रसार सुलभ केला. त्यासंदर्भातील लेख आज असलेल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.

पारमार्थिक ज्ञान अत्यंत सुलभ करून ते लोकभाषेंत सांगण्यास संत ज्ञानदेवांनी जेव्हा आरंभ केला, तेव्हा महाराष्ट्रात एक क्रांतीच होऊ लागली. वेदांचे सार मराठी भाषेत आल्यामुळे आबालवृद्धांना आणि स्त्रीशुद्रादीकांनाही परमार्थाची माहिती मिळू लागली. ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ सर्व महाराष्ट्रात झाला. भागवत धर्माच्या संघटनेचा पाया संत ज्ञानदेवांच्या आधारे घालण्यात आला.

शके १२१२ मध्ये या ग्रथांचा जन्म झाला आणि या सारस्वताच्या झाडाखाली अनेक जिवांनी विश्रांती घेतली; परंतु ज्ञानदेवांची अवतारसमाप्ती झाल्यानंतर थोड्याच दिवसांत महाराष्ट्राचे स्वराज्य नाहीसे होऊन जिकडे तिकडे इस्लामी संस्कृतीचा चांद झळकू लागला. समाजापासून ज्ञानदेवी ग्रंथ दूर झाल्यामुळे सौख्याचा ठेवाच हरपल्याप्रमाणे होऊन गेले.

१६ व्या शतकात संत एकनाथ महाराजांचा प्रभाव महाराष्ट्रात पडू लागल्यावर ज्ञानदेवीचा उद्धार करण्याचे काम सहजच त्यांच्याकडे आले. यासंबंधी नाथ एका अभंगात म्हणतात,

श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नात । सांगितली मात मजलागी ।
अजान वृक्षाची मुळी कंठास लागली । येऊन आळंदी काढ वेगी ।।

संत ज्ञानदेवांचा संदेश संत एकनाथांना मिळाला. ‘अजान वृक्ष’ म्हणजे रूपकाने अज्ञान-वृक्ष असण्याचा संभव आहे. आदेशाप्रमाणे संत एकनाथ महाराजांनी आळंदीस येऊन समाधीचे दार उघडले आणि संत ज्ञानदेवांपुढील प्रत घेतली. पैठणास आल्यावर तिचे शुद्धीकरण केले. त्याच्या ओव्या महत्त्वाच्या आहेत :

श्री शके पंधराशे साहोत्तरी । तारणनाम संवत्सरीं ।।
एका जनार्दने अत्यादरी । गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली ।।
बहुकाळ पर्वंणी गोमटी । भाद्रपद मास कपिला षष्ठी ।
प्रतिष्ठानी गोदातटीं । लेखनकासाठी संपूर्ण जाली ।।

साभार :  ‘दिनविशेष’, १५ सप्टेंबर १८५४