स्वच्छतेसाठी २ सहस्र सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग !
मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्तींचे विर्सजन झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे जमा होणारे निर्माल्य आणि इतर कचरा यांची स्वच्छता ‘महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स’ यांच्या वतीने १० सप्टेंबर या दिवशी क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर असे ४०० सभासद, एन्.सी.सी. मधील १ सहस्र ५०० मुले-मुली अन् अधिकारी, असे एकूण अनुमाने २ सहस्र सभासद सहभागी झाले होते.
श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर कचरा जमा होऊन परिसर अस्वच्छ होतो. युवकांच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. तरुण मुलांचा ओढा संकेतस्थळ, भ्रमणभाष, दूरचित्रवाणी यांच्याकडे अधिक आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणमैत्री आणि समाजसेवा यांच्याकडे विद्यार्थ्यांना वळवण्यासाठी विविध सेवा प्रकल्पांचे आयोजन स्काऊट्स आणि गाईड्स राज्य संस्थेच्या वतीने करण्यात येत असते.