ज्ञानवापी प्रकरणी जिल्हा न्यायालय १२ सप्टेंबर ला निर्णय देणार !

वाराणसीमधील सुरक्षेत प्रचंड वाढ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापीच्या प्रकरणी जिल्हा न्यायालय उद्या, १२ सप्टेंबर या दिवशी निर्णय देणार आहे. या पार्श्‍वभूमीवर वाराणसी शहरामध्ये पोलिसांकडून प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाराणसी शहरामध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून ध्वजसंचालन आणि गस्त घातली जात आहे. तसेच उपाहारगृहे, धर्मशाळा, विश्रामगृहे यांची यांची पडताळणी केली जात असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

कोणत्या सूत्रावर असणार निर्णय ?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाराणसी जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश कृष्ण विश्‍वेश यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी यावरील निर्णय १२ सप्टेंबरपर्यंत सुरक्षित ठेवला होता. ज्ञानवापी आणि तेथील शृंगार गौरी यांची पूजा करण्याची अनुमती हिंदूंना देण्यात यावी, यावर निर्णय देण्यात येणार आहे. ही मागणी हिंदु पक्षाकडून ४ महिलांनी दिवाणी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिल्यानंतर तो करण्यात आल होता. त्याला मुसलमान पक्षाकडून आक्षेप घेण्यात आल्यावर तो फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता.