दत्ताच्या नामजपाने आलेल्या काही अनुभूती

सनातन-निर्मित ‘दत्ताची नामजप-पट्टी’

स्वप्नात नागरूपातील पूर्वज दिसण्याचा त्रास दत्ताचा नामजप केल्यावर बंद होणे

‘मला स्वप्नात अगदी रोज साप दिसायचे, भीती वाटायची, कधी कधी दचकून जाग यायची. सनातन संस्थेच्या साधिका कु. माधवी आचार्य यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला सांगितला. ज्या दिवशी मी नामजप चालू केला त्या दिवसापासून स्वप्नात साप दिसणे थांबले. त्यानंतर २ – ३ वेळा ज्या ज्या दिवशी दत्ताचे नाम घ्यायला विसरले, त्या त्या दिवशी परत साप स्वप्नात दिसले.’

– कु. माधुरी विजयराव देशपांडे, अंबाजोगाई.

(सर्प आणि नाग हे पूर्वजांचे अस्तित्व दर्शवतात. – संकलक)


दत्ताच्या नामजपाच्या वेळी डोळे मिटून बसल्यावर घरातून पुष्कळ लोक बाहेर पडतांना दिसणे आणि तेव्हापासून नामजप मनापासून होणे

‘ॐ श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केल्यानंतर दोन दिवसांनी मला नामजपाच्या वेळी डोळे मिटून बसल्यावर सूक्ष्मातून घरातून पुष्कळ लोक बाहेर पडत आहेत, असे दृश्य दिसले व त्यानंतर जड झालेले डोके हलके झाले, तसेच छातीत दुखत होते तेही थांबले. त्या दिवसापासून नामजप मनापासून होऊ लागला.’

– कु. सविता हडकर, डोंबिवली, मुंबई.


पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्यावर आलेल्या काही अनुभूती

बंद पडण्याच्या स्थितीत असलेली दुधाची डेअरी पितृपक्षात केलेल्या दत्ताच्या नामजपाने चालू होणे

‘माझे पती दुधाच्या डेअरीमध्ये नोकरी करतात. ते बरीच वर्षे नोकरी करीत आहेत; परंतु गेल्या काही मासांपासून डेअरी बंद पडण्याच्या स्थितीत आली होती. त्यामुळे घरामध्ये ताण जाणवत असे. पितृपक्षामध्ये मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ नामजप करू लागले. त्यानंतर ज्या डेअरीमध्ये दुधाचा थेंबही नव्हता, तिथे अचानक प्रचंड प्रमाणात दूध पुरवठा चालू झाला. नामजप चालू केल्यापासून घरातील वातावरणही निवळले. ही घटना घडण्यापूर्वी सगळे लोक म्हणत होते की, डेअरी बंदच पडेल; पण दत्तगुरूंच्या कृपेने हा धोका टळला.’

– सौ. राजश्री महादेव वांडरे, मिरज


पितृपक्षात पितरांना जेवण दिल्यावर मृत आजोबा जेवायला बसलेले दिसणे, त्यानंतर आजोबांनी येऊन त्यांची मद्य पिण्याची इच्छा प्रकट करणे आणि आजोबांना समजवण्यासमवेतच काही दिवस दत्ताचा नियमित नामजप केल्याने ही दृश्ये दिसणे बंद होणे

‘१३.१०.२००४ रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच सर्वपित्री अमावास्या होती. त्या दिवशी स्वयंपाक करत असतांना मी प्रार्थना केली, ‘माझ्या पूर्वजांची आवड-नावड मला ठाऊक नाही, तरी त्यांना आवडेल, असा स्वयंपाक माझ्याकडून होऊ दे.’ पितरांना जेवण वाढण्याच्या वेळी ‘माझे आजोबा जेवायला येऊन बसले आहेत’, असे मला दिसले. त्यांना कांद्याची भजी आवडत असल्याने मी ती केली होती. माझ्या आजोबांना मद्य पिण्याची सवय होती. त्या वेळी मी त्यांना म्हटले, ‘मी तुम्हाला मद्य देऊ शकत नाही; परंतु तुमच्या आवडीचे जे पदार्थ आहेत, ते तुम्ही ग्रहण करा आणि ईश्वराला शरण येऊन पुढच्या गतीला जा.’

दोन दिवसांनंतर मी पहाटे ५ वाजता उठून नामजप करत असतांना मला फणा काढलेला नाग दिसू लागला. बर्‍याचदा प्रार्थना करूनही ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हते. मला माझे आजोबा पुन्हा दिसले. ते मला म्हणाले, मला मद्य हवे आहे.’ मी त्यांना म्हटले, ‘छोट्या छोट्या गोष्टींत अडकू नका.’ त्यानंतर दररोज तीन माळा ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप केल्याने काही दिवसांतच ते दृश्य दिसणे पूर्णपणे बंद झाले.’

– सौ. पुष्पा चौगले, देवद, पनवेल.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक