पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

मुंबई – आयकर विभागाने शीव आणि बोरिवली झोपडपट्टीतील राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाड टाकून कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघडकीस आणली. हे राजकीय पक्ष नोंदणीकृत असले, तरी निवडणूक आयोगाची त्यांना मान्यता नव्हती. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे. देशभरात अशी कारवाई चालू आहे. देशभरात २०५ ठिकाणी आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. याचा वापर करचोरीसाठी करण्यात येत होता. मुंबई आणि गुजरात मधील काही राजकीय पक्षांना मिळालेला निधी हा २ सहस्र कोटींहून अधिक असू शकतो. कर्णावतीसह गुजरातमध्ये करचोरीसाठी असे अनेक राजकीय पक्ष चालवले जात आहेत. गुजरातमध्ये २१ राजकीय पक्षांवर धाडी टाकण्यात आल्या होत्या. यासाठी मुंबईहून १२० आयकर अधिकार्‍यांचे पथक गुजरातमध्ये पाठवण्यात आले होते. २ दिवसांपासून देशभरात आयकर विभागाचे धाडसत्र चालू आहे. १०० चौ. फूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बँक अहवालानुसार, या पक्षाला मागील २ वर्षांत १०० कोटींची देणगी मिळाली होती.

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराविषयी विचारणा केली. त्या वेळी त्याने केवळ नावापुरते आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असून पक्षनिधी आणि इतर व्यवहार हे कर्णावती येथील लेखा परिक्षकाकडून (ऑडिटरकडून) केले जात असल्याचे त्याने सांगितले.

देणगीसाठी प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वापर आयकर सवलत मिळवण्यासाठी केला जातो. पक्षाला मिळालेल्या निधीतून ०.०१ टक्के रक्कम कापली जात होती. त्यानंतर लेखा परीक्षकाने (ऑडिटर) सिद्ध केलेल्या संस्थांमध्ये हा पैसा दिला जात होता. बोरीवलीमध्येही एका लहान घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून ५० कोटी रुपयांचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले.