अनंतचतुर्दशीला मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

  • गुलालाची उधळण    

  • फटाके फोडण्याचे प्रमाण तुलनेत उणावले

  • काही ठिकाणी कृत्रिम हौदांत विसर्जन

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात अनंतचतुर्दशीच्या दिवशी १० दिवसाच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात विसर्जन केले. २ वर्षांनंतर कोरोना महामारीच्या वेळची बंधने दूर झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात सर्वत्र भाविकांची गर्दी झाली. विसर्जनाच्या वेळी काही ठिकाणी वरुण राजानेही उपस्थिती दर्शवली होती. सतत होत असलेल्या जनजागृतीमुळे ‘यावर्षी पूर्वीच्या तुलनेत फटाके फोडण्याचे प्रमाण तुलनेत उणावले आहे’, असे भाविकांच्या लक्षात आले. मुंबईत गुलालाची उधळण करत मोठ्या मूर्तींचे गिरगाव चौपाटीसह विविध चौपाट्यांवर विसर्जन झाले. येथे विविध पक्षांचे झेंडेही मिरवणुकांत मोठ्या प्रमाणावर होते. येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुंबईत प्रचंड मोठ्या जनसागराने अथांग महासागरामध्ये जड अंतःकरणाने श्री गणेशाला शेवटचा निरोप दिला !

ठाणे येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

ठाणे येथे नेहमीप्रमाणे मासुंदा तलावातील हौदात, मोठ्या मूर्तींचे पारसिकच्या खाडीत, तर कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळील खाडीत मूर्तींचे विर्सजन झाले, तर   रायलादेवी आणि उपवन येथे कृत्रिम हौदांत विर्सजन करण्यात आले.

पुणे येथे लेझिम, ढोल-ताशा पथकांच्या गजरात मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन

पुणे – लेझिम आणि ढोल-ताशा पथकांच्या गजरात पुण्यातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका निघाल्या. पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचे विसर्जन सायंकाळी पार पडले. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी या मंडळाच्या पथकात महिला वाहतूक पोलिसाने मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. लाठी फिरवणे, तलवार चालवणे आदी सांस्कृतिक वैशिष्ट्य सादर करत एक एक श्री गणेशाची मिरवणूक पुढे पुढे सरकली. पुण्यातील काही भागांत फिरत्या हौदात विसर्जन झाले.

नाशिक – सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपत येथील मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले. यात विविध देवतांच्या वेशभूषा परिधान केलेले कार्यकर्ते होते.

कोल्हापूर येथे श्री गणेशमूर्तींचे खाणीत विसर्जन

कोल्हापूर – पंचगंगा नदीत विर्सजनाला बंदी असल्याने येथील खणीत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत विर्सजन करण्यात आले. मोठ्या श्री गणेशमूर्ती असल्याने येथे विसर्जनासाठी बसवलेले पट्ट्याचे यंत्र काढण्यात आले होते.

सांगली – येथे उत्साहात आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने कृष्णा नदीत श्री गणरायांचे विर्सजन करण्यात आले.

जळगाव – येथे पारंपरिक पद्धतीने, उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशमूर्तींचेे विसर्जन झाले. विदर्भ आणि मराठवाडा या भागांतही पारंपरिक आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे उत्साहात विसर्जन पार पडले.