१. पूर्वीपासूनच माझी भगवान शिवावर भक्ती असून ‘शिव माझा पिता आहे’, असा भाव असणे; मात्र ‘शिव आणि पार्वती यांचा पुत्र असणारा श्री गणेश माझा भाऊ आहे’, असा विचार कधीच न येणे
‘वर्ष २०२० मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि मूर्ती’, या विषयावर संशोधन केले होते. श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि मी (सौ. श्वेता शॉन क्लार्क) त्या संशोधनावर आधारित एक लेख लिहिण्याची सेवा करत होतो. तेव्हा माझ्या मनात श्री गणेशाप्रती भाव दाटून आला. मी उत्तर भारतीय असल्यामुळे माझी पूर्वीपासूनच भगवान शिवावर भक्ती होती. ‘शिव माझा पिता आहे’, असा माझा भाव आहे; परंतु ‘भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र असणारा श्री गणेश माझा भाऊ आहे’, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही.
२. श्री गणेशाची अनुभवलेली प्रीती !
२ अ. श्री गणेशाने पांढर्या शुभ्र आणि विशाल रूपात येऊन ‘आपण शिव कुटुंबातील असून मी तुझा भाऊ आहे अन् मी तुझे रक्षण करीन’, असे सांगणे : २५.८.२०२० या दिवशी सूक्ष्मातून श्री गणपति पांढर्या शुभ्र आणि विशाल रूपात माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, ‘मी तुझा भाऊ आहे आणि आपण शिवाच्या कुटुंबातील आहोत. याविषयी मी तुला तुझ्या बालपणी अनेक प्रकारे सूचित करण्याचा प्रयत्न केला; परंतु तुझ्या ते कधी लक्षातच आले नाही, उदा. तुला हत्ती आवडतो.’ मी त्याच्या कपाळाकडे पाहिल्यावर ‘पांढर्या शुभ्र चैतन्यशक्तीचा प्रचंड प्रवाह माझ्याकडे येत आहे’, असे मला दिसले. मला ती चैतन्यशक्ती ग्रहण करता येत नव्हती. माझ्या सर्वांगावर रोमांच आले. मला पुष्कळ आनंद जाणवत होता; पण मला तो शब्दांत व्यक्त करता येत नव्हता. गणपति मला म्हणाला, ‘शिव कुटुंबामध्ये केवळ आनंदच आहे. मी तुझा भाऊ आहे. मी तुझे रक्षण करीन. ‘तुझी काळजी घेणारा एक भाऊ असावा’, असे तुला नेहमी वाटायचे ना ? मी नेहमीच तुझ्या समवेत असतो. मी गेली अनेक वर्षे ते तुझ्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत होतो; पण तुझ्या ते लक्षात येत नाही; म्हणून मी आज ‘तुला माझे अस्तित्व सहजतेने अनुभवता यावे’, असे दर्शन देण्याचे ठरवले आहे.’ ‘गणपति माझा भाऊ आहे’, या जाणिवेनेच माझी पुष्कळ भावजागृती झाली.
१ इ. श्री गणेशाने राखी न बांधल्याविषयी विचारल्यावर राखी पौर्णिमेच्या दिवशी त्याला राखी न बांधल्याची खंत वाटणे; परंतु तरीही गणपतीने दर्शन दिल्यावर त्याची प्रीती पाहून भावजागृती होणे : १०.९.२०२१ या दिवशी श्री गणेशचतुर्थी होती; परंतु १ सप्टेंबरपासूनच माझ्या मनात गणपतीविषयी पुष्कळ विचार येऊन त्याच्या स्मरणाने माझी भावजागृती होत होती. ‘माझ्या मनात श्री गणेशाविषयीचे विचार का येत आहेत ?’, असे मला वाटले. तेव्हा मला ‘गणपतीचे विशाल रूप माझ्या दिशेने येत आहे’, असे जाणवले. तो मला म्हणाला, ‘श्वेता, माझी राखी कुठे आहे ? यावर्षी तू मला राखी का बांधली नाहीस ?’ तेव्हा ‘मी या वर्षीच्या राखीपौर्णिमेला गणपतीला राखी बांधायला विसरले’, याची मला खंत वाटली; मात्र तरीही दयाळू गणपति माझ्याकडे येऊन माझ्यावर कृपेचा वर्षाव करून मला दर्शन देत होता. गणपतीची माझ्यावरील प्रीती पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळेच देवता आम्हा साधकांना सूक्ष्मातून दर्शन देतात आणि अनुभूती देऊन कृपाही करतात’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. श्वेता शॉन क्लार्क, संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.९.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |