प.पू. दास महाराज यांनी प.प. श्रीधरस्वामी यांचे अनुभवलेले संन्यस्त जीवन आणि त्यांचा कृपाप्रसाद !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘प.पू. दास महाराज यांनी ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्या शिष्यांचा त्यांच्याप्रती सेवाभाव कसा होता ?’, यासंदर्भात प.पू. दास महाराज यांची सेवा करणार्‍या साधकांना त्यांनी अनुभवकथन केले. भगवान श्रीधरस्वामी यांच्यातील चैतन्य आणि चैतन्यमय सेवास्वरूप कृपाप्रसाद यांचा लाभ स्वामींचे शिष्य अन् भक्त यांनी कशा प्रकारे करून घेतला, याचे अनुभव येथे दिले आहेत.

१. भगवान श्रीधरस्वामी यांचे संन्यस्त जीवन !

१ अ. भगवान श्रीधरस्वामींनी संन्यासधर्माचे कडक पालन करणे : ‘भगवान श्रीधरस्वामी नेहमी त्रिकाल स्नानसंध्या करत असत. स्वामी संन्यासधर्माचे कडक पालन करत असत. स्वामी म्हणायचे, ‘‘आम्ही संन्यासी आहोत, तर आम्ही संन्यासधर्माचे पालन केलेच पाहिजे.’’

१ आ. स्वामींनी साबण न वापरता माती किंवा गोमूत्र यांचा वापर करणे : स्वामींनी अंघोळ करणे, हात-पाय धुणे किंवा अन्य कोणत्याही वेळी साबण वापरला नाही. ते नेहमी माती किंवा गोमूत्र यांचा वापर करत असत.

१ इ. स्वामींनी नदी, तलाव, झरे आणि विहीर अशा ठिकाणी थांबून स्नान करणे : स्वामी स्नानासाठी नेहमी थंड आणि वहात्या पाण्याचा वापर करत असत. रुग्णाईत असतांनाही त्यांनी स्नानासाठी गरम पाणी वापरले नाही. यात्रेच्या वेळी ते नेहमी नदी, तलाव, झरे, विहीर अशा ठिकाणी थांबून स्नान करत असत. स्वामी मोटेने (विहिरीतून पाणी काढण्यासाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या चामड्यापासून बनवलेल्या मोठ्या पिशवीने) विहिरीतून काढलेले पाणी अंघोळीसाठी वापरत नसत. ते विहिरीत उतरून अंघोळ करत असत.

१ ई. भगवान श्रीधरस्वामींचे अस्तित्व आणि चैतन्य यांमुळे त्यांनी स्नान-संध्या केलेली स्थाने शुद्ध होणे : स्वामी यात्रेच्या वेळी जेथे स्नान-संध्या करत, ती ठिकाणे त्यांचे अस्तित्व आणि चैतन्य यांमुळे शुद्ध होत असत. ‘लोक स्वामींना अनिष्ट शक्तींमुळे बाधित झालेल्या काही विहिरी आणि नद्या यांमध्ये ‘जाऊ नका’, असे सांगायचे; परंतु स्वामी त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थानाची शुद्धी करत असत. तेथील अनिष्ट शक्ती नष्ट झाल्यामुळे शुद्ध झालेले पाणी समाजाला वापरण्यायोग्य होत असे.

२. भगवान श्रीधरस्वामी यांच्यातील चैतन्य आणि कृपाप्रसाद यांचा भक्तांना झालेला लाभ

२ अ. भगवान श्रीधरस्वामींनी हात धुण्यासाठी वापरलेले पाणी भक्तांनी तीर्थ म्हणून प्राशन करणे आणि स्वामींनी वापरलेली माती अंगाला लावल्यावर काही भक्तांना त्वचाविकार नाहिसे झाल्याची अनुभूती येणे : स्वामींनी  हात धुण्यासाठी वापरलेले पाणी त्यांचे भक्त तीर्थ म्हणून प्राशन करायचे. स्वामींचे शिष्य त्यांचे हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी, बारीक चाळलेली माती आणि पाणी खाली सांडू नये; म्हणून स्वच्छ कापड बांधलेले भांडे घेऊन उभे रहात असत. स्वामी हाताला माती लावून त्या भांड्यावर हात धूत असत. त्या वेळी हात धुतलेले पाणी वस्त्रगाळ होऊन भांड्यात साठत असे आणि माती कपड्यावर रहात असे. स्वामींचे शिष्य ते चैतन्यमय पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असत, तसेच त्वचारोग झालेले ती माती अंगाला लावण्यासाठी नेत असत. या उपायांनी अनेक भक्तांना त्वचाविकार नष्ट झाल्याची आणि  आजारपण गेल्याची अनुभूती आली आहे. (भक्तांना त्यांच्यातील स्वामींविषयीच्या भावामुळे अशा अनुभूती येत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संकलक) 

३. भगवान श्रीधरस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता अन् प्रार्थना

भगवान श्रीधरस्वामी हे अवतारी पुरुष होते. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे एकत्रित तत्त्व म्हणजे दत्त ! भगवान श्रीधरस्वामी दत्ताचे अवतार आहेत. भगवान श्रीधरस्वामींच्या आताच्या दुसर्‍या अवतारातही, म्हणजे विष्णुरूपी, परब्रह्मस्वरूपी, सच्चिदानंदरूपी, परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आमच्यासारख्या सामान्य जिवांना स्वतःजवळ घेतले आहे. ते आमच्यासारख्या जिवांचा उद्धार करून घेण्यासाठी सेवा आणि साधना करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या या अनंत कृपेबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘या अमृततुल्य संधीचा लाभ करून घेता येऊ दे’, अशी सद्गुरु माऊली आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– आपला चरणसेवक दास,

प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२२)

अनुभवजन्य ज्ञान असणारे प.पू. दास महाराज यांचे लिखाण !

‘प.पू. दास महाराज यांचे प्रतिदिनचे अनुभव आणि त्यांच्या अनुभूती हे लिखाण पुष्कळ वैशिष्ट्यपूर्ण आहे; कारण प.पू. दास महाराज यांनी ते सर्व अनुभवलेले आहे अन् प्रतिकूल स्थितीत त्यांनी साधनेसाठी खडतर प्रयत्न केलेले आहेत आणि अजूनही करत आहेत. आपल्याला अशा संतांचे सान्निध्य लाभले आहे. ‘त्यांना नुसते तात्त्विक ज्ञान ठाऊक असून ते सांगत आहेत’, असे नसून त्यांनी स्वतः कृती केल्यामुळे हे त्यांच्या अनुभवातील ज्ञान आहे. अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले