|
मुंबई – महाराष्ट्रातील हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचे आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. ५ सप्टेंबर या दिवशी मुंबईत आल्यावर भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत ते पुढे म्हणाले की, राजकारणात जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा होणे आवश्यक आहे. मुंबईतील राजकारणावर केवळ भाजपचे वर्चस्व निर्माण करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवणे आवश्यक आहे. २०१४ या वर्षी केवळ २ जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेने नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर मते मागितली अन् जिंकून आले. शिवसेनेने जनतेचा विश्वासघात केला असून आमच्याही जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढा. ‘अभी नही तो कभी नही’ या आवेशात निवडणूक लढवायची आहे. खरी शिवसेना आमच्यासमवेत आली आहे.
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी ५ सप्टेंबर या दिवशी स्वतःच्या कुटुंबियांसमवेत येथील ‘लालबागच्या राजा’चे (श्री गणेशाचे) दर्शन घेतले.