श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात. त्यातून आनंद अनुभवतात; परंतु आजकाल यांत चुकीच्या चालीरीती पडत चालल्या आहेत. यामुळे महान हिंदु धर्माची परंपरा कुठेतरी लोप पावतांना दिसत आहे. पाश्चात्त्य देशांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात आल्याने ते आपल्या संस्कृतीचा गौरव करत आहेत.

कोरोना महामारीनंतर सध्या चालू असलेला गणेशोत्सव हिंदु धूमधडाक्यात साजरा करत आहेत; परंतु हा सण साजरा करतांना यातून श्री गणेशाच्या होणार्‍या विडंबनाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत आहे. पुणे येथे असेच विडंबन हे पिण्याचे पाणी बनवणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनातून आणि शालेय साहित्य उपयोगात आणून सिद्ध केलेल्या मूर्तीच्या माध्यमातून होत आहे. अशा विडंबनातून श्री गणेशाची कृपा आपल्यावर कधीतरी होईल का ? खरेतर असे विडंबन थांबवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न होणे अपेक्षित असूनही दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. अनेक जन्महिंदू, तसेच प्रसारमाध्यमे यांचा यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा ‘सर्जनशीलतेचा आविष्कार’ असा मानसिक स्तरावरचा असतो. ‘विज्ञापन किती छान आहे’ किंवा ‘वेगवेगळ्या सामुग्रीचा उपयोग करून कशी मूर्ती साकारली आहे’, या दृष्टीने त्याकडे पहाण्यात येते. श्री गणेशोत्सव जगभरातील अनेक देशांत साजरा केला जात आहे; परंतु अन्य कोणत्याच देशात श्री गणेशाचे अशा प्रकारे विडंबन होतांना दिसत नाही. दुर्दैव असे की, बहुसंख्येने हिंदु असलेल्या भारतात विविध स्तरांवर श्री गणेशाचे विडंबन सर्रास होतांना दिसते.

अशातच शासन-प्रशासन यांच्याकडूनही अनेक हिंदु धर्मविरोधी निर्णय घेण्यात येत आहेत. पुणे महापालिकेने श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर बंदी घातली असून ‘मूर्ती दान करा अथवा संकलन केंद्रात जमा करा’, असे धर्मद्रोही आवाहन केले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत असे सांगण्यात आले आहे. पुरो(अधो)गाम्यांच्या ताटाखालचे मांजर बनून हा हिंदुद्वेष केला जात आहे. अशा प्रकारे धर्मविसंगत मूर्तीदान करणे, हेसुद्धा आपण भावपूर्णरित्या सेवा केलेल्या श्री गणरायाचे विडंबनच आहे. याचा वैध मार्गाने विरोध करून धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. यानेच श्री गणेशाची आपल्यावर कृपा होणार आहे, हे लक्षात घ्या !

– श्री. सुनील ओजाळे, पुणे