प्रेमळ, सेवाभावी आणि संतांप्रती भाव असणार्‍या पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विजया मिलिंद भिडे (वय ६० वर्षे) !

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका (३०.८.२०२२) या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची मोठी मुलगी सौ. कांचन मयूर मराठे यांना जाणवलेली आईची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सौ. विजया भिडे

आईविषयी कितीही लिहिले, तरी ते अल्पच आहे, तरी कृतज्ञतेच्या भावाने मी हा छोटासा प्रयत्न करत आहे.

१. आईच्या घरी धार्मिक वातावरण असल्याने तिच्यावर साधनेचे संस्कार होणे

माझ्या आईचे माहेर गोवा येथील आहे. आईच्या माहेरी धार्मिक वातावरण असल्याने तेथे धर्माचरणावर पुष्कळ भर होता. तेथे श्री चिदंबरस्वामींची उपासना करतात. त्यामुळे लहानपणापासून आईवरही साधनेचे संस्कार झाले.

२. सासरी आल्यावर तेथील कुलाचार निष्ठेने पाळणे आणि समर्थ रामदासस्वामी यांची उपासना करणे

लग्नानंतर आईने सासरच्या सर्व कुलाचारांचे श्रद्धेने पालन केले. आमच्या घरी माझ्या पणजोबांपासून समर्थ रामदासस्वामी यांची उपासना केली जाते. घरी प.प. श्रीधरस्वामींनी स्थापन केलेल्या समर्थ रामदासस्वामींच्या पादुकाही आहेत. ही सर्व उपासनाही आई मनापासून करते. या पादुकांच्या रूपाने ‘समर्थ रामदासस्वामी सतत आपल्या समवेत आहेत’, असा तिचा भाव असतो.

३. सर्वांवर निःस्वार्थ प्रेम करणारी आई !

ती केवळ आमच्याशीच नव्हे, तर सर्वांशीच प्रेमाने वागते आणि बोलते. नातेवाईक, साधक आणि शेजारी या सर्वांना तिने प्रेमाने जोडून ठेवले आहे. ती गरजूंना सढळ हाताने साहाय्य करते.

४. मुलींवर आणि नातीवर चांगले संस्कार करणे

सौ. कांचन मराठे

अ. आई स्वयंपाक करतांना नेहमी नामजप करते आणि आम्हालाही नामजप करायला लावते. ती आम्हाला सांगते, ‘‘स्वयंपाक करतांना नामजप केल्यामुळे अन्नावर चांगले संस्कार होतात. त्याचा आपल्याला आणि ते ग्रहण करणार्‍यालाही लाभ होतो.’’

आ. ती माझ्या मुलीला (चि. अवनी मयूर मराठे, आध्यत्मिक पातळी ५५ टक्के, वय ३ वर्षे) स्तोत्र, श्लोक, सात्त्विक गाणी, असे काही ना काही शिकवत असते आणि ‘ते सतत तिच्या कानांवर पडत रहावे’, यासाठी प्रयत्न करते. ती आम्हालाही तसे करायला लावते. आई अवनीकडून अंघोळीच्या वेळी आणि जेवणापूर्वी श्लोक म्हणून घेते.

५. स्वतःच्या प्रकृतीची शक्य ती सर्व काळजी घेणे

तिला वयाच्या ४३ व्या वर्षी कर्करोग झाला; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ निष्ठा ठेवून तिने त्यावर धैर्याने मात केली. स्वतःच्या त्रासांवर ती शक्य ते उपाय स्वतःच करते. ‘आपले क्रियमाण चुकू नये’, असा तिचा प्रयत्न असतो. मधुमेह झाल्यावर तिने गोड खाणे सोडले. काही वेळा तिचा रक्तदाब वाढतो. हे लक्षात आल्यावर तिने मीठ खाणे अत्यल्प केले. तिला असह्य त्रास होत असतांना उत्तरदायी साधकांनी सांगितलेला उपायांचा जप ती काटेकोरपणे करते.

६. संत असलेल्या प.पू. यशवंत मराठेगुरुजी यांच्याविषयी मनात भाव असणे

प.पू. यशवंत मराठेगुरुजी हे माझ्या आजोबांचे (माझे वडील श्री. मिलिंद माधव भिडे यांचे वडील (कै.) माधव शंकर भिडे यांचे) आतेभाऊ होते. ते अंध होते. ते गाणे, अध्यात्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी लोकांना मार्गदर्शन करत असत.

आमचे भिडे कुटुंबीय त्यांच्या समवेत रहात होते. त्यांच्याकडे अध्यात्माविषयी मार्गदर्शन घ्यायला अनेक थोर लोक येत असत. ‘आता आम्ही रहातो, ती वास्तू प.पू. मराठेगुरुजींचीच आहे’, असे आई आम्हा दोघा बहिणींना (मी आणि माझी लहान बहीण सौ. पूर्वा हृषिकेश गोखले (पुणे) यांना) नेहमी सांगते.

७. प.पू. मराठेगुरुजी यांच्या सहवासाचा लाभ करून न घेतल्याविषयी खंत वाटणे

आईला केवळ एकच वर्ष प.पू. मराठेगुरुजींचा सत्संग आणि सहवास मिळाला. तेव्हा तिला ‘संतसहवासाचा लाभ कसा करून घ्यायचा ?’, याविषयी फारसे काही ठाऊक नव्हते; परंतु ‘आपण एवढ्या थोर संतांचा काहीच लाभ करून घेतला नाही’, याची तिला सतत खंत वाटते. ‘एवढ्या मोठ्या संतांचा सहवास मिळण्यास भाग्य लागते’, असे ती आम्हाला नेहमी सांगते.

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची भेट होऊन गुरुकृपायोगानुसार साधना चालू होणे

ती नेहमी आम्हाला सांगते, ‘‘समर्थ रामदासस्वामी, प.पू. मराठेगुरुजी आणि आपले पूर्वज, यांची आपल्यावर फार मोठी कृपा आहे.’’ वर्ष १९९२ मध्ये या सर्वांच्या कृपेमुळेच आईची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली आणि आईची गुरुकृपायोगानुसार साधना चालू झाली. अध्यात्मप्रसाराच्या सेवेच्या निमित्ताने ती समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोकांना भेटते. तिच्यामुळे आम्हालाही पुष्कळ चांगल्या लोकांना भेटायला मिळाले आहे.

९. सेवाभाव

९ अ. अनेक संतांची भावपूर्ण सेवा करणे : पूर्वी आमच्या घरी पू. अनंतस्वामी, पू. जिजाताई हाटे आणि प.पू. काणे महाराज वास्तव्याला असायचे. ‘त्यांना बाहेर नेऊन आणणे, त्यांचे जेवण आणि निवास यांची सोय करणे, त्यांची सेवा करणे’, हे सगळे आई करायची. (कै.) प.पू. विमल फडकेआजी (सनातनच्या प्रथम संत) पूर्वी नेहमी आमच्या घरी वास्तव्याला असायच्या. तेव्हा आई त्यांची मनापासून सेवा करायची.

९ आ. घरातील वृद्ध आणि आजारी व्यक्ती यांची आनंदाने सेवा करणे : आईने आजारी व्यक्तींची, तसेच घरातील मोठ्यांची आनंदाने सेवा केली. तिने नेहमी ‘मी त्या व्यक्तीमधील देवाची सेवा करत आहे’, असा भाव ठेवला.

१०. सेवेची तळमळ

अ. कितीही अडचणी आल्या, तरी ती तिला दिलेली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

आ. ३ वर्षांपूर्वी आईला गुरुपौर्णिमेनिमित्त विज्ञापने आणण्याची सेवा होती आणि त्याच वेळी मी गरोदर होते. आईची प्रकृती बरी नव्हती, तरीही तिने घरी बसून भ्रमणभाषवरून अधिकाधिक विज्ञापने मिळवण्याचा प्रयत्न केला. वर्ष २०२२ च्या गुरुपौर्णिमेलाही तिची प्रकृती ठीक नसतांना तिने अधिकाधिक विज्ञापने मिळवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.

११. तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. ती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे मार्गदर्शन आचरणात आणते.

१२. आईकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. ‘आपल्या बोलण्या-वागण्यामुळे कुणीही दुखावले जाणार नाही’, याकडे लक्ष द्यायला पाहिजे.

आ. आपण सासू-सासर्‍यांची सेवा करतो, तेव्हा ‘ही माझी सासू आहे, हे सासरे आहेत’, असा विचार करू नये. त्यांचे गुणदोष न बघता ‘मी त्यांच्यामधील ईश्वराची सेवा करत आहे’, हा भाव ठेवावा. त्यामुळे सेवेतून आनंद मिळतो.

इ. ‘मला देव हवा आहे’, हा विचार मनात असला, तर इतरांच्या दोषांकडे लक्ष जात नाही.

१३. प्रार्थना

आज आम्ही जे काही आहोत, ते आईमुळेच आहोत. ‘आईचे गुण आमच्यातही येऊ देत आणि आम्हाला आईकडून सतत शिकता येऊ दे. तिची साधनेत अधिकाधिक प्रगती होऊ दे’, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना !’

– सौ. कांचन मयूर मराठे (मोठी मुलगी), पुणे (३१.३.२०२२)