मुंबई – भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना २ वेळा अमली पदार्थ देण्यात आले होते, अशी कबुली त्यांचा स्वीय साहाय्यक सांगवान यांनी दिली आहे. सोनाली यांचा मृत्यू संशयास्पद असून त्यामागे कटकारस्थान असल्याचा दावा सोनाली यांच्या भावाने केला होता. त्यानंतर गोवा पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण करतांना सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळले. त्यामध्ये फोगाट यांच्यासमवेत आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंह एका क्लबमध्ये पार्टी करतांना दिसत होते. या दोघांनीही सोनाली यांना बलपूर्वक काहीतरी पाजण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी या प्रकरणी कसून अन्वेषण केल्यानंतर आरोपींनी सोनाली फोगाट यांना अमली पदार्थ दिल्याचे कबूल केले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस योग्य दिशेने करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच फोगाट यांच्या नातेवाइकांच्या मागणीप्रमाणे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याची आवश्यकता असल्यास देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.