सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे बुजवण्याचा देखावा !

वाहने जाताक्षणी खड्ड्यांवरील मुरूम सहजतेने निघून येत असल्याचे उघड

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरात विविध मार्गांवरील खड्डे दुरुस्तीचे काम चालू केले आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकांच्या मार्गांवरील खड्डे बुजवायला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली खड्डे बुजवण्याचा देखावा चालू असल्याचे समोर आले आहे. ‘प्रशासनाने खड्डे बुजवण्याची प्रक्रिया वरवर केली असून खड्ड्यांवरील मुरूम वाहने जाताक्षणी सहजतेने निघतांना दिसून येत आहे. त्यामुळे बुजवलेले खड्डे किती दिवस टिकतील?, याविषयी शंकाच आहे’, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

शहरातील एकूण १ सहस्र ९०८ किलोमीटर रस्त्यापैकी तब्बल ६०० किलोमीटर रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. अशा रस्त्यांवरून वाहन चालवणेही जिकीरीचे झाले आहे. अद्यापही शहरातील काही भागांमध्ये खड्डे बुजवले गेलेले नाहीत. त्यांतील ‘बस स्थानक ते सरस्वती चौक रस्ता’, ‘पुणे नाका ते बस स्थानक’ हे शहरातील मुख्य रस्तेच अद्याप नादुरुस्त आहेत.

संपादकीय भूमिका 

साधे खड्डेही नीट बुजवू न शकणारे सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन शहराचा कारभार कसा हाकत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! यास उत्तरदायी असलेल्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !